पुणे : मराठा समाज व खुल्या प्रवर्गाच्या मागासलेपणाच्या सर्वेक्षणाबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “१५ दिवसांत सर्वेक्षण होणार असल्याचे वर्तमानपत्रात वाचण्यात आले. जर २ दिवसांत आणि १५ दिवसांमध्ये सर्वेक्षण होणार असेल तर आणखी दोन महिने घ्या आणि सर्व जातींची जनगणना करुन टाका. आमचे हेच म्हणणे आहे. दोन महिन्यांत जर जातीनिहाय जनगणना पूर्ण होत असेल तर ती केली पाहिजे”, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना वेड लागले असल्याची टीका केली होती. त्यावर भुजबळांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले, “मला वेड लागलेलचं आहे. ओबीसींसाठी काम करण्याचं वेड मला गेली ३५ वर्षांपासून लागलेलं आहे. ओबीसींसाठी, मागासवर्गीयांसाठी, फुले शाहु आंबेडकरांच्या मार्गाने जाण्यासाठी मला वेड लागलेलं आहे. ते आता शेवटच्या श्वासापर्यंत जाणार नाही”, असे भुजबळ म्हणाले.

हेही वाचा : पुण्यातील तीन वर्षांतील बेकायदा बांधकामांची होणार झाडाझडती; महापालिका आयुक्तांचा आदेश; चौकशीसाठी समिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सावित्री बाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. “भिडे वाड्याच्या डिझाईनचे काम सध्या सुरू आहे. काम लवकर व्हावं ही इच्छा आहे. पंढरपूरला ६ तारखेला ओबीसींचा एल्गार मेळावा आहे. ७ तारखेला मुंबईत कार्यक्रम असल्याने नांदेड येथील सभेला जाऊ शकणार नाही”, असे देखील भुजबळ यांनी म्हटले आहे. पुन्हा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील. आगामी निवडणुकीत देखील महायुतीचा मुख्यमंत्री होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.