पुणे : शहरात पादचाऱ्यांकडील दागिने, मोबाइल संच हिसकावून नेणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत पादचाऱ्यांकडील मोबाइल संच, तसेच दागिने हिसकावून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध मुंढवा आणि कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत एका महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला २६ जून रोजी रात्री आठच्या सुमारास मुंढव्यातील केशवनगर भागातून निघाल्या होत्या. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ८० हजारांची सोनसाखळी हिसकावून नेली. महिलेने आरडाओरडा केला. चोरटे भरधाव वेगात दुचाकीवरुन पसार झाले. सहायक पोलीसनिरीक्षक राजू महानोर तपास करत आहेत.
कोढवा भागातील गोकुळनगर चौकात एका पादचारी तरुणाच्या हातातील १० हजार रुपयांचा मोबाइल संच हिसकावून नेल्याची घटना शुक्रवारी (२७ जून) रात्री घडली. याबाबत एका तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण मध्यरात्री एकच्या सुमारास गोकुळनगर चौकातून निघाला होता. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्याच्या हातातील मोबाइल संच हिसकावून नेला. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे तपास करत आहेत.
पीएमपी प्रवासी ६० हजारांची बांगडी चोरी
पीएमपी प्रवासी ज्येष्ठ महिलेच्या हातातील ६० हजारांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला विश्रांतवाडीतील धानोरी भागात राहायला आहे. तक्रारदार महिलेची आई पुणे स्टेशन ते वारजे माळवाडी या मार्गावरील बसमधून प्रवास करत होती. बसमध्ये गर्दी होती. प्रवासात चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेच्या हातातील ६० हजारांची बांगडी चोरली. सहायक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे तपास करत आहेत.