लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: अ‍ॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचे गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी गुलटेकडी मार्केट यार्डातील फळे-भाजीपाला विभाग बंद ठेवून निषेध करण्यात आला. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनसह बाजार आवारातील विविध संस्था आणि संघटनांनी केलेल्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याने बंद यशस्वी झाला. त्याचा परिणाम म्हणून महात्मा फुले मंडईमध्ये नागरिकांना भाजी मिळणे दुरापास्त झाले होते.

श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध ऊर्फ बापू भोसले म्हणाले की, बाजार समिती आवारात कोणताही परवाना न घेता बेकायदेशीररित्या अतिक्रमण करून लिंबाची विक्री अनेक महिलांकडून सुरू होती. या लिंबू विक्रीमुळे बाजार आवारात वाहतूककोंडी होत होती. या विरोधात बाजार समिती प्रशासनाने पोलिसांच्या सहकार्याने अवैध लिंबू विक्रेत्यांवर कारवाई केली. मात्र, ही कारवाई सुरू असताना अथवा कारवाई झाल्यानंतर कोणतीही तक्रार, गुन्हा अधिकाऱ्यांवर दाखल झाला नाही.

हेही वाचा… पुणे: अवैध विक्रेते, फेरीवाल्यांवर रेल्वेने उगारला दंडुका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, लिंबू विक्रेते पूर्णपणे बंद केल्यानंतर तब्बल सहा महिन्यांनंतर या प्रकरणी अधिकारी, अडते यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले. ही अन्यायकारक गोष्ट असून भविष्यात खोट्या गुन्ह्यांच्या भीतीने कोणतीही कारवाई होणार नाही. त्यामुळे बाजार समिती अधिकारी, कर्मचारी, बाजार घटकांनी व्यथा मांडत दाखल झालेले गुन्हे रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे केली आहे. तसेच बाजारातील अडते, टेम्पो, कामगार, तोलणार आदी सर्व संघटनांनीदेखील गुन्हे मागे घेण्याबाबत पुणे पोलीस आयुक्तांना निवेदन दिले. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी बाजार घटकांनी बाजार बंद ठेवत निषेध व्यक्त केला.