पुणे : ‘पुणे हा ‘राष्ट्रवादी’चा बालेकिल्ला आहे. पक्षाला मानणारा मोठा वर्ग पुण्यात असल्याने महापालिकेच्या निवडणुकीसाठी १६२ जागांवर निवडणूक लढण्याची तयारी केली पाहिजे,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी स्वबळाचा नारा देऊन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला.
‘महायुतीमध्ये असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मैत्रीपूर्ण लढती झाल्या, तरी चालतील, पण केवळ तिकीट मिळाले नाही, म्हणून आपला कार्यकर्ता दुसऱ्या पक्षात जायला नको,’ असे पटेल म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या पुणे शहर कार्यालयाचे उद्घाटन प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पटेल बोलत होते.
ते म्हणाले, ‘आपण महायुतीत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत जेथे जेथे शक्य असेल, तेथे जरूर युती करावी, पण जेथे शक्य नाही तेथे परिस्थिती पाहून निर्णय करावा लागणार आहे. पुण्यात पक्षाची ताकद चांगली असल्याने १६२ जागा लढण्याची तयारी ठेवली पाहिजे. यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आत्तापासूनच तयारी सुरू करावी.’
‘पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची ताकद चांगली आहे. त्यामुळे पक्षाचे हक्काचे कार्यालय असणे खूप गरजेचे होते. पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, पार्थ पवार यांनी यामध्ये लक्ष घालून हे कार्यालय उभे केले आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविले जाणार आहेत,’ असे पटेल यांनी स्पष्ट केले.
तटकरे म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष प्रचंड राजकीय इच्छाशक्ती असलेला पक्ष आहे. राज्यात महायुतीची सत्ता आहे. त्यामुळे निवडणूक आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत. मात्र, अनेक शहरांतील राजकीय परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे कोणत्या शहरात कोणी किती आणि कशा पद्धतीने निवडणूक लढवायची याचा अंतिम निर्णय राज्याचे तीन नेते घेतील. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच निवडणुकीच्या कामाला सुरुवात करावी.’
कार्यालयात विविध कक्ष
शिवाजीनगर मेट्रो स्टेशनच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शहर कार्यालय असून, यामध्ये नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी वेगवेगळे कक्ष उभारण्यात आले आहेत. कार्यालय उद्घाटनप्रसंगी शहराध्यक्ष सुभाष जगताप, सुनील टिंगरे यांच्यासह पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.