पुणे : वातानुकूलित टॅक्सीच्या भाडेदरात प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने वाढ करून महिना उलटला आहे. तरीही याची अंमलबजावणी ओला आणि उबर या कंपन्यांनी केलेली नाही. या कंपन्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला केराची टोपली दाखविल्याचे यामुळे समोर आले आहे. याप्रकरणी कॅबचालकांनी आता बेमुदत बंदचा इशारा दिला आहे.

वातानुकूलित (एसी) टॅक्सीचे दर वाढविण्यासाठी टॅक्सी संघटनांनी वारंवार आंदोलन केले होते. यानंतर पहिल्या दीड किलोमीटरसाठी ३७ रुपये आणि पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी २५ रुपये दराचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन कार्यालयाने तयार केला होता. या प्रस्तावाला तत्कालीन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. त्यामुळे हे नवीन दर जानेवारी महिन्यात लागू झाले असून ओला, उबरने याची अंमलबजावणी केलेली नाही.

हेही वाचा…पुणे महापालिकेचा अजब कारभार : वृक्षारोपणासाठी जागा नाही, तरीही लावणार पाच कोटींची रोपे

याप्रकरणी कॅबचालकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. कॅबचालक २० फेब्रुवारीपासून पुण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर निदर्शने करणार आहेत. याचबरोबर बेमुदत संपही त्या वेळी सुरू करणार आहेत. ओला आणि उबरची सेवा विनापरवाना सुरू आहे. त्यांच्याप्रमाणे बेकायदा व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही कॅबचालकांनी केली आहे.

हेही वाचा…पुणे : श्री गणेश जयंतीनिमित्त आज मध्य भागातील वाहतुकीत बदल, छत्रपती शिवाजी रस्ता बंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ओला, उबरसारख्या कंपन्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेले दर लागू करण्यास कंपन्या टाळाटाळ करीत आहेत. कोणताही वैध परवाना नसताना त्या व्यवसाय करीत असून, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. यामुळे रोजच्या उत्पन्नावर संकट आलेले कॅबचालक तीव्र आंदोलन छेडणार आहेत. – डॉ. केशव क्षीरसागर, अध्यक्ष, भारतीय गिग कामगार मंच