पुणे : यंदा डेंग्यूसह चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ सुरू असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत रुग्णसंख्या कमी आहे. यंदा सप्टेंबर अखेरपर्यंत डेंग्यूचे संशयित १ हजार ९३७ रुग्ण आणि निदान झालेले ८६ रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत डेंग्यूचे संशयित ३ हजार ५६४ रुग्ण आणि निदान झालेले २९४ रुग्ण आढळले होते.
यंदा मे महिन्यापासून जोरदार पाऊस सुरू झाल्याने तेव्हापासून साथरोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरू झाला. डेंग्यूचे संशयित रुग्ण मे महिन्यात २३ होते. ते नंतर वाढून जून महिन्यात १२३, जुलैमध्ये ३६६, ऑगस्टमध्ये ७६५ आणि सप्टेंबरमध्ये ५५५ रुग्ण आढळून आले. यावर्षी ऑगस्ट महिन्यात डेंग्यूच्या संशयित रुग्णांची सर्वाधिक नोंद झाली आहे. या वर्षातील डेंग्यूच्या एकूण रुग्णांपैकी सुमारे ७५ टक्के रुग्ण हे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात आढळून आले आहेत. गेल्या वर्षी एकूण रुग्णांपैकी जवळपास निम्मे रुग्ण ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात आढळून आले होते.
पुण्यात चिकुनगुनियाचे सप्टेंबर महिन्यात ५ रुग्ण आढळले आहेत. या वर्षी सप्टेंबरअखेरपर्यंत चिकुनगुनियाचे २२ रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरअखेरपर्यंत चिकुनगुनियाचे ३११ रुग्ण आढळले होते. हिवतापाचे सप्टेंबरमध्ये २ रुग्ण आढळून आले आहेत. या वर्षी सप्टेंबरअखेरपर्यंत हिवतापाच्या एकूण ३ रुग्णांची नोंद झाली असून, गेल्या वर्षी एकूण ५ रुग्ण आढळले होते.
डासांमुळे पसरणाऱ्या आजारांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आरोग्य विभाग सातत्याने उपाययोजना करीत आहे. डासोत्पत्ती स्थाने नष्ट करून कीटकनाशक औषधाच्या फवारणीवर भर देण्यात येत आहे. आरोग्य विभागाची डासोत्पत्ती स्थाने शोधण्याची मोहीम सुरू आहे. डासोत्पत्ती स्थाने आढळून आल्याप्रकरणी २ हजार ८०३ घरमालकांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. या प्रकरणी त्यांना ४ लाख ८८ हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे, अशी माहिती महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी दिली.
हिवतापाचे आता जलद निदान
हिवतापाच्या रुग्णांचे लवकर निदान झाल्यास व त्यावर उपचार झाल्यास रोगाच्या प्रसाराचा धोका कमी होतो. यासाठी पुणे महानगरपालिकेकडून प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात येते. प्रत्यक्ष सर्वेक्षणात वस्ती पातळीवर तापाच्या रुग्णांच्या हिवतापाच्या स्लाईड घेऊन उपचार करण्यात येतात. यासाठी महापालिकेने गेल्या महिन्यात २०० आशा सेविकांचे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांना हिवतापाच्या स्लाईड कीटचे वाटप केले. आता इडियाडा ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी इंडिया या कंपनीने सामाजिक दायित्वांतर्गत आणखी ३०० आशांचे प्रशिक्षण देण्यासाठी ३०० आशा स्लाईड कीट देणगी म्हणून दिल्या आहेत. यामुळे एकूण ५०० आशा सेविकांच्या माध्यमातून हिवतापाचे जलद निदान होणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी दिली.