पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात साखळी उपोषण सुरू करण्यात येत असून या सर्व घडामोडी लक्षात घेऊन पुणे जिल्ह्यात राजकीय नेत्यांना बंदी घालण्याचा निर्णय मराठा क्रांती समन्वयकांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कुंजीर यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. तर २८ तारखेला शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी राजेंद्र कुंजीर म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला ४० दिवसांची मुदत दिली होती. ती मुदत सरकारने पाळली नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील आता पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. त्या सर्व घडामोडी दरम्यान पुण्यातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक पुणे स्टेशन येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोरील बाजूस साखळी उपोषणाला बसले आहेत. तसेच राज्यातील अनेक गावांमध्ये राजकीय नेतेमंडळींना येण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे शहर आणि जिल्ह्यात देखील राजकीय नेत्यांना बंदी घालण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चा मार्फत घेण्यात आला आहे. ज्या ठिकाणी राजकीय नेत्यांचे कार्यक्रम आणि बैठका असतील, त्या ठिकाणी आम्ही काळे झेंडे दाखविणार असल्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला.

हेही वाचा : पिंपरी- चिंचवडमध्ये मराठा बांधव आक्रमक; जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषण सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच ते पुढे म्हणाले की, २८ तारखेला सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात येणार आहे. तसेच आम्हाला आजपर्यंत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्य सरकारने केवळ तारखा दिल्या आहेत. पण निर्णय काही घेतले नाही. त्यामुळे आम्ही आता मागे हटणार नसल्याची भूमिका यावेळी त्यांनी मांडली आहे.