पुणे : इमारतीचा स्लॅब कोसळून मजुराचा मृत्यू झाल्याप्रकरणी लष्कर पोलिसांकडून ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी ठेकेदार युवराज राऊत (रा. महंमदवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस उपनिरीक्षक अवधूत देशमुख यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर भागातील साचापीर स्ट्रीट परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरू होते. १ जुलै रोजी इमारतीतील स्लॅबवर शुभंकर मंडल (वय १९, मूळ रा. पश्चिम बंगाल) याच्यासह तीन मजूर काम करत होते. दुपारी दोनच्या सुमारास स्लॅब कोसळला. दुर्घटनेत मंडल याच्यासह तीन मजूर गंभीर जखमी झाले. मंडल याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. बांधकाम मजुरांच्या सुरक्षेविषयक पुरेशी काळजी न घेणे, तसेच सुरक्षाविषयक साधने न पुरविल्याचे चौकशीत उघडकीस आले. बांधकाम ठेकेदार राऊत याच्या बेजबाबदारपणामुळे दुर्घटना घडल्याचे तपासात उघडकीस आले. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक शिवनंदा जाधव तपास करत आहेत.