पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) घर मिळवून देण्याच्या आमिषाने पाच जणांनी एका महिलेची ४६ लाख २९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पिंपरीत उघडकीस आला आहे. याबाबत ३५ वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन महिलांसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी महिलेला पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये लोकांनी न स्वीकारलेले घर मिळवून देण्याचे आमिष दाखविले. फिर्यादीसह त्यांच्यासोबतच्या नागरिकांकडून ४६ लाख २९ हजार रुपये ऑनलाइन आणि रोख स्वरुपात घेतले. विश्वास बसावा यासाठी आरोपींनी पीएमआरडीएमध्ये कामाला असल्याचे सांगितले. शासकीय कागदपत्रे दाखविली. फिर्यादीसह त्यांच्यासोबतच्या नागरिकांचे बनावट अर्ज भरुन घेतले. घर न देता आर्थिक फसवणूक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक लोहार तपास करित आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नोकरीच्या आमिषाने २८ लाखांची फसवणूक

९० लाख रुपयांचे वार्षिक पॅकेजची नोकरी देण्याचे आमिष दाखवून २८ लाख ३२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार निगडीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी सुनील सदाशिव सोळांकुरे (वय ५३, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी सोळांकुरे यांच्याशी संपर्क साधला. ९० लाख रुपये वार्षिक पॅकेजची नोकरी देण्याचे आमिष दाखविले. त्यांचा विश्वास संपादन केला. वेळोवेळी ऑनलाइन पैशांची मागणी केली. त्यांच्याकडून २८ लाख ३२ हजार रुपये घेतले. कोणत्याही प्रकारची नोकरी न देता फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सोळांकुरे यांनी निगडी पोलिसात धाव घेतली. आरोपींविरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.