पुणे : थोड्या विश्रांतीनंतर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या २४ तासांत घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस सुरू असून, लोणावळा, कुरवंडे अशा काही ठिकाणी १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस नोंदवला गेला आहे.
गेल्या काही दिवसांत सर्वदूर पाऊस पडत आहे. मात्र, जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात पावसाची तीव्रता जास्त आहे. ताम्हिणीसारख्या काही ठिकाणी अतिवृष्टीसदृश्य पाऊस होऊन एका दिवसात तब्बल ३७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. मात्र, त्यानंतर दोन दिवस पावसाने काहीशी उसंत घेतल्याचे दिसून आले. आता सोमवारपासून पुन्हा घाटमाथा परिसरात पाऊस वाढला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, कुरवंडे येथे १६२ मिलीमीटर, गिरीवन येथे १०५, भोर येथे ९०, लोणावळा येथे १४९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर परिसरातही सोमवारी रात्रीपासून पाऊस पडत होता. त्यामुळे शिवाजीनगर येथे १८.१, एनडीए येथे १७, चिंचवड येथे २९, तळेगाव येथे ४५.५, लवळे येथे ३७ मिलीमीटर पाऊस पडला.