पुणे : बाणेर टेकडीवर फिरायला आलेल्या कोरियातील अभियंता तरुणाला चोरांनी लुटल्याची घटना घडली. चोरांनी अभियंत्याला धमकावून त्याच्याकडील महागडा मोबाइल संच हिसकावून नेला. याप्रकरणी बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याबाबत अभियंता तरुणाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तळेगाव दाभाडे भागातील एका वाहननिर्मिती करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपनीत अभियंता आहेत. ते मूळचे कोरियातील असून, सध्या बालेवाडी भागात ते सहकाऱ्यांसोबत वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तक्रारदार अभियंता शनिवारी (१७ मे) सकाळी बाणेर परिसरातील टेकडीवर फिरायला गेले होते. त्या वेळी तिघांनी त्यांना अडवले. त्यांना धमकावले. धक्काबुक्की करून त्यांच्याकडील ७२ हजारांचा मोबाइल संच हिसकावून नेला. या घटनेनंतर घाबरलेल्या अभियंत्याने बाणेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.
बाणेर टेकडी, हनुमान टेकडीवर फिरायला आलेल्या नागरिकांना लुटण्याच्या घटना गेल्या वर्षी घडल्या होत्या. त्यानंतर बोपदेव घाटात एका महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली होती.
टेकड्यांच्या परिसरात घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी मंजूर केला होता. या निधीतून टेकड्यांच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसाविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. टेकड्यांच्या परिसरात नियमित गस्त घालण्याच्या सूचना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिल्या आहेत. टेकड्यांच्या परिसरात पॅनिक बटण यंत्रणा बसविण्यात येणार आहे.