लोणावळा: मान्सूनपूर्व पावसाने अवघ्या महाराष्ट्रभर जोरदार हजेरी लावली आहे. पर्यटन नगरी असलेल्या लोणावळ्यामध्ये देखील गेल्या २४ तासात तब्बल २३३ मिलिमीटर पाऊस कोसळला आहे. यामुळे पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गेल्या वर्षी याच काळात शून्य मिलिमीटर पाऊस कोसळला होता. यावर्षीचा आज पर्यंत तब्बल ४१० मिलिमीटर पाऊस कोसळलेला आहे. त्यापैकी निम्मा पाऊस गेल्या २४ तासात कोसळला आहे.
अवघ्या महाराष्ट्रात मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला असून नदी नाले एक झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील बारामती मध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी पूल वाहून गेले आहेत. जमीन खचली आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यामध्ये देखील मुसळधार पाऊस झाला आहे. गेल्या २४ तासात तब्बल २३३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. पर्यटन नगरी असलेल्या लोणावळ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत आधीच पाऊस झाल्याने पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. आज देखील ढगाळ वातावरण असून पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.