पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाण्यासाठी मेट्रो मार्गिका नसल्याने महामेट्रोच्या नजीकच्या स्थानकावरून विशेष बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच ज्या ठिकाणी मेट्रो मार्गिका नाही, त्या परिसरापर्यंत मेट्रो स्थानक ते घर परिसर अशी सुविधा सुरू करण्याचा मानस आहे.

त्यासाठी महामेट्रोला एक हजार बसची आवश्यकता आहे. अल्पदरात ही सेवा द्यायची असल्याने या बस महामेट्रोने स्वत: खरेदी करायच्या की पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) घ्यायच्या याबाबत दोन्ही संस्थांकडून नियोजन करण्यात येत आहे. विमानप्रवाशांना लवकरच ही सेवा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

हेही वाचा : पुणे : ओढे, नाल्यांवरील पुलांचेही होणार स्ट्रक्चरल ऑडिट कोणी घेतला निर्णय?

सुशासन दिनानिमित्त पाटील यांनी बुधवारी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांची भेट घेत त्यांचा गौरव केला. तसेच सिव्हिल कोर्ट ते मंडई मेट्रो प्रवास केला. तत्पूर्वी, पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना २०३० पर्यंत पुण्यातील कानाकोपऱ्यात मेट्रोचे जाळे विस्तारलेले असेल, अशी स्पष्टोक्ती केली.

पाटील म्हणाले, ‘पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे स्थलांतर करण्याचा विचार सुरू होता. त्यामुळे मेट्रो मार्गिकेच्या मूळ आराखड्यात आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आला नाही. परिणामी वनाज ते रामवाडी ही मेट्रो विमानतळापर्यंत जात नाही. नवीन मार्गिका प्रस्तावित असल्या, तरी या ठिकाणापर्यंत मेट्रो जाणे अशक्य असल्याने नजीकच्या मेट्रोस्थानकापासून अल्पदरात बससेवा उपलब्ध करून देण्यासाठी महामेट्रो प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर भविष्यात ज्या ठिकाणी महामेट्रोची स्थानके होणार आहेत, त्या प्रत्येक स्थानकावरून अल्पदरात घर परिसरात जाण्यासाठी विशेष बससेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येत आहे.’

शहरातील कोणत्याही ठिकाणी मेट्रोने जाण्यासाठी भविष्यात आणखी नवीन मार्गिकांचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. २०३० पर्यंत पुणे शहरात सर्वत्र ठिकाणी मेट्रोचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे, तर निगडी ते कात्रज मेट्रो मार्गिका सुरू झाल्यावर मेट्रो प्रवाशांची संख्या आठ लाखांवर जाणार असल्याचा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय

‘पुण्यातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी मेट्रो हा सक्षम पर्याय आहे. शहरात प्रत्येक ठिकाणी मेट्रो मार्गिकांच्या विस्तारासाठी कामाचे वेळापत्रक ठरले आहे. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्च २०२५पर्यंत सुरू होईल. निगडी ते कात्रज मेट्रो तीन वर्षांत मार्गी लागेल.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरात सर्वत्र मेट्रोमार्गिका असण्याच्या स्थितीसाठी २०३० पर्यंतचा कालावधी लागेल. त्यासाठी मेट्रोकडून प्रस्ताव तयार करून त्याला महापालिका, राज्य आणि केंद्र शासनाची मान्यता मिळविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

  • नागरिकांना घर ते मेट्रो प्रवास सुलभ होण्यासाठी फीडर बससेवेची उपलब्धता
  • पीएमपीच्या नवीन बस घेताना काही बस मेट्रोला देण्याचा पर्याय
  • पीसीएमसी ते निगडी मार्गावर ठेकेदार नियुक्ती करून कामाला सुरुवात
  • महामेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील पाच मार्गिकांचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे, तर दोन मार्गिकांचे प्रस्ताव महापालिकेकडे मान्यतेसाठी सादर
  • निगडी ते चाकण मार्गिकेच्या प्रकल्प अहवालाचे काम सुरू