पुणे : शहरातील वाढत्या ध्वनिप्रदूषणाबाबत अनेक जण तक्रार करताना दिसतात. आपल्या आजूबाजूला होत असलेले वाहनांचे आवाज, गोंगाट यामुळे ध्वनिप्रदूषण होत असले तरी ते नेमके किती आहे, याची माहिती नागरिकांना नसते. आपल्या भोवताली किती ध्वनिप्रदूषण आहे याची प्रत्यक्ष माहिती पुणेकरांना आता मिळणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून शहरात चार मध्यवर्ती ठिकाणी ध्वनिप्रदूषणाची प्रत्यक्ष पातळी दर्शविणारे डिजिटल फलक लवकरच कार्यान्वित केले जाणार आहेत.
ध्वनिप्रदूषणामुळे नागरिकांना अनेक त्रास होतात मात्र, याबद्दल त्यांना माहिती नसते. ध्वनिप्रदूषणामुळे डोकेदुखी, ऐकायला कमी येणे, उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि निद्रानाश यांसारख्या समस्या निर्माण होतात. यामुळेच आपल्या भोवताली असलेल्या ध्वनिप्रदूषणाची माहिती नागरिकांना असणे गरजेचे असते. आता पुणेकरांना ही माहिती मिळावी यासाठी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने पुढाकार घेतला आहे. शहरात ध्वनिप्रदूषणाची पातळी प्रत्यक्ष दर्शविणारे डिजिटल फलक बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच हे फलक कार्यान्वित होणार आहेत.
हेही वाचा : लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीची हत्या करून रिक्षात ठेवला मृतदेह, प्रियकर फरार
शहरात चार मध्यवर्ती ठिकाणी ध्वनिप्रदूषणाची पातळी दर्शविणारे फलक असतील. यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, हडपसरमधील टाटा हनीवेल कंपनी, नवी पेठेतील इंद्रधनुष्य कार्यालय या चार ठिकाणी हे डिजिटल फलक लावण्यात येत आहेत. या फलकांवर तेथील प्रत्यक्ष ध्वनिप्रदूषणाची पातळी दर्शविण्यात येणार आहे. याचबरोबर तो भाग कोणत्या क्षेत्रातील आहे आणि तेथील कमाल आवाज मर्यादा या बाबीही फलकावर देण्यात येतील, अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या क्षेत्र अधिकारी ज्योती सुतार यांनी दिली.
ध्वनिप्रदूषण डिजिटल फलक
१) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक
२) जिल्हाधिकारी कार्यालय
३) टाटा हनीवेल (हडपसर)
४) इंद्रधनुष्य (नवी पेठ)
हवेची गुणवत्ता दर्शविणारे आणखी फलक
शहरातील हवेची गुणवत्ता दर्शविणारे तीन डिजिटल फलक सध्या शहरात आहेत. त्यात हवा गुणवत्ता निर्देशांक दर्शविला जातो. त्यामुळे नागरिकांना हवेची पातळी खराब आहे की चांगली याची माहिती मिळते. शहरात संगमवाडीतील नायडू सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यान या ठिकाणी हवेची गुणवत्ता दर्शविणारे आणखी दोन डिजिटल फलक बसविण्याचा प्रस्ताव आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळुंके यांनी दिली.