पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी २० जानेवारीपासून जालना येथील आंतरवली सराटी येथून मोर्चाला सुरुवात केली असून शुक्रवारी (२६ जानेवारी) मुंबईतील आझाद मैदानात हा मोर्चा दाखल होणार आहे. तर पुण्यातील वाघोली येथून मनोज जरांगे पाटील यांच्या हजारोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी असलेल्या मोर्चाला आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सुरुवात झाली आहे. मनोज जरांगे यांचे ठिकठिकाणी स्वागत केले जात आहे. तर यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांसोबत संवाद देखील साधला.
मनोज जरांगे पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणुक लढवावी आणि त्यांनी काही उमेदवार देखील उभे करावे, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, निवडणुक लढवणं हा आपला मार्ग नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, हाच आपला, माझा उद्देश आहे. राजकारण म्हटलं की, फोडाफोडीच आलीच, त्यामुळे आपलं समाजकारण सुरू ठेवायचं आणि जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत लढा सुरू ठेवायचा अशी भूमिका त्यांनी मांडली.
तुमचा जालना ते मुंबई असा मोर्चाचा मार्ग असून आता पुण्यात काही मिनिटांत तुम्ही दाखल होणार आहात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होणार आहे. त्या प्रश्नावर ते म्हणाले की, शहर असो की ग्रामीण भाग, मराठा समाजातील लेकरांसाठी हा मोर्चा काढला आहे. आम्ही तुम्हाला त्रास व्हावा म्हणून चाललो नसून एक दिवसासाठी शहरातून जात आहोत, त्यामुळे तुम्ही एक तांब्या भरून पाणी दिलं पाहिजे. तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत जाऊन आमरण उपोषण करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ज्या कोणी नेत्यांनी विश्वासघात केला आहे. त्या नेत्यांची नावे मुंबईत गेल्यावर जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले