पुणे : मागील वर्षभरापासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील लढा देत असून राज्यभरात जनजागृती आणि शांतता रॅली काढत आहेत. प्रत्येक ठिकाणी सभा घेऊन सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांबाबत भूमिका मांडत आहेत. प्रत्येक ठिकाणी होत असलेल्या रॅली आणि सभांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्याच दरम्यान मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रमुखांना मराठा आरक्षणाबाबत तुमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी, या मागणीसाठी राजकीय पक्षांच्या प्रमुखांच्या घराबाहेर आंदोलनं केली जात आहेत. हेही वाचा : पुणे: मराठा आरक्षण शांतता फेरीत चोरट्यांचा सुळसुळाट, रोकड, सोनसाखळी लंपास तर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुण्यातील मोदी बागेतील ऑफिससमोर मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील हे 'जवाब दो' आंदोलन करणार आहेत. या आंदोलना दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये या पार्श्वभूमीवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप हे देखील असंख्य कार्यकर्त्यांसोबत उपस्थित आहेत.