पुणे : पुणे-मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. त्यातील नीरा ते लोणंद स्थानकांच्या दरम्यान दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर रेल्वे गाडीची प्रति तास ११७ किलोमीटर वेगाची चाचणी यशस्वीपणे घेण्यात आली. त्यामुळे या मार्गावर आता गाड्यांचा वेग वाढणार आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी नीरा ते लोणंद या स्थानकांदरम्यानच्या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाची पाहणी केली. हा मार्ग ७.६४ किलोमीटर लांबीचा आहे. या पाहणीनंतर त्यांनी या मार्गावर गाड्या चालविण्यास संमती दिली. त्यामुळे नीरा-लोणंद या दरम्यान आता दोन्ही मार्गांवरून रेल्वे वाहतूक होईल. त्यातून गाड्या सुरळीत आणि वेगाने धावण्यास मदत होईल. या वेळी अरोरा यांच्यासोबत निर्माण विभागाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी विवेक कुमार गुप्ता, विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : पीएमपी अध्यक्षांच्या बदलीवरून पुण्यातील राजकीय वातावरण तापले

पुणे – मिरज हा रेल्वे मार्ग २७९.०५ किलोमीटर लांबीचा आहे. या रेल्वे मार्गावर आतापर्यंत १७४.६८ किलोमीटर दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यात पुणे ते शिंदवणे, आंबळे ते राजेवाडी, दौंडज ते वाल्हा, शेणोली ते भवानीनगर, भवानीनगर ते ताकारी, ताकारी ते किर्लोस्करवाडी, सातारा ते कोरेगाव, पळशी ते जरंडेश्वर, नांद्रे ते भिलवडी, नांद्रे ते सांगली यांचा समावेश आहे. इतर भागातही दुहेरीकरणाचे कार्य वेगाने सुरू आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुणे-मिरज रेल्वे मार्ग दुहेरीकरण

  • एकूण लांबी – २७९.०५ किमी
  • दुहेरीकरण पूर्ण – १७४.८५ किमी
  • प्रकल्प खर्च – ४,८८२.५३ कोटी रुपये
  • आतापर्यंतचा खर्च – ३,२०० कोटी रुपये
  • पूर्ण झालेले काम – ८६ टक्के