पुणे : कांद्याची आवक वाढल्याने आठवडाभरात कांद्याच्या दरात किलोमागे २० रुपयांनी घट झाली आहे. तेजीत असलेल्या कांद्याच्या दरात घट झाल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे. नवीन लाल कांद्याचा (हळवी) हंगाम सुरू झाला असून, बाजारात त्याची आवक वाढली आहे. त्याचबरोबर, हवामान विभागाने अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीसाठी बाजारात पाठविण्यास सुरुवात केली आहे. घाऊक बाजारात एक किलो कांद्याला प्रतवारीनुसार १५ ते ३० रुपये दर मिळाला आहे. किरकोळ बाजारात नवीन लाल कांद्याला प्रतवारीनुसार ३० ते ५० रुपये किलो दर मिळाला आहे.

गेल्या आठवड्यात किरकोळ बाजारात एक किलो कांद्याचा दर प्रतवारीनुसार ५० ते ७० रुपयांपर्यंत होता. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात अहिल्यानगरमधील श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, बीड जिल्ह्यातील आष्टी, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, तसेच पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस पाठविला आहे. गेल्या आठवड्यापासून कांद्याची आवक वाढली असून, बाजारात दररोज ८० ते १०० ट्रक कांदा विक्रीस पाठविला जात आहे. गेल्या आठवड्यात घाऊक बाजारात एक किलो कांद्याला ४० ते ५० रुपये दर मिळाला होता. आठवडाभरात कांद्याचा दर निम्म्याने कमी झाला आहे.

हेही वाचा : नवीन वर्षात घरे महागणार? सरकारच्या नव्या प्रस्तावामुळे घरांच्या किमती वाढण्याची भीती

कांद्याचा दर

घाऊक बाजार : १५ ते ३० रुपये किलो

किरकोळ बाजार : ४० ते ५० रुपये किलो

अवकाळी पावसामुळे कांद्याचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने पुणे, अहिल्यानगर, बीड, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीसाठी बाजारात पाठवला. दक्षिणेकडील राज्यांतून असलेली मागणी कमी झाली आहे. मागणीच्या तुलनेत आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने दरात घट झाली आहे.

रितेश पाेमण, कांदा व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड

हेही वाचा : शहरबात : घरफोडी रोखण्यासाठी सजगता महत्त्वाची

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या आठवड्यात किरकोळ बाजारात कांद्याचा दर ५० ते ७० रुपये किलो होता. आवक वाढल्याने दरात २० टक्क्यांनी घट झाली आहे. कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत असून, मागणीत घट झाली आहे.

प्रकाश ढमढेरे, भाजीपाला व्यापारी, किरकोळ बाजार