पुणे : पर्यटनाला चालना देण्यासाठी सिंहगड किल्ल्यावर येत्या काही दिवसांत ‘सिग्नेचर वाॅक’ सुरू करण्यात येणार आहे. सिंहगड किल्ल्यानंतर या सिग्नेचर वाॅकमध्ये आंबेगाव येथील शिवसृष्टी हा थीम पार्क दाखविण्यात येणार आहे. स्वारगेट येथून वातानुकूलित गाड्यांद्वारे ही सुविधा देण्यात येणार असून, त्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल, असा दावा महापालिका प्रशासाकडून करण्यात आला आहे. शहराची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्वाची ओळख विद्यार्थी, नागरिक, पर्यटकांना व्हावी, यासाठी महापालिकेने स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने हेरिटेज वाॅक हा उपक्रम सुरू केला आहे.

शनिवारवाडा ते विश्रामबागवाडा या ऐतिहासिक वास्तू दरम्यानची १२ ऐतिहासिक ठिकाणे पायी फिरून या उपक्रमातून दाखविली जातात. त्याच धर्तीवर सिंहगड किल्ला आणि शिवसृष्टी येथे दुसरा हेरिटेज वाॅक सुरू करण्यात येणार आहे. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. सिंहगड किल्ला येथे त्याअंतर्गत सिग्नेचर वाॅक सुरू करण्यात येणार आहे. स्वारगेट येथून वातानुकूलित मध्यम आसनक्षमतेच्या गाड्यांद्वारे ही सुविधा दिली जाणार आहे. तसेच विविध भागांतील पर्यटकांना स्वारगेट येथे येणे सोईचे व्हावे यासाठी शहराच्या सर्व भागातून स्वारगेटसाठी गाड्या सोडण्यात येणार आहेत.

हेही वाचा : पुणे : पावसाचा परतीचा प्रवास सोमवारपासून; हवामान विभागाचा अंदाज

परदेशी पर्यटकांना हाॅटेलमधून थेट सिग्नेचर वाॅकमध्ये सहभागी होण्यासाठी बससुविधा देण्याचे नियोजित आहे. सकाळी साडेसहाला सुरू होणाऱ्या या वाॅकमध्ये सिंहगड किल्ला आणि त्यावरील ऐतिहासिक ठिकाणे दाखविण्यात येणार आहेत, असे विकास ढाकणे यांनी सांगितले. प्रस्तावित सिग्नेचर वाॅक शुक्रवारी प्रायोगिक तत्त्वावर आयोजित करण्यात आला. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, कार्यकारी अभियंता सुनील मोहिते, शाखा अभियंता दीपक बारभाई, पर्यटक मार्गदर्शक डाॅ. अजित आपटे या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा : वरिष्ठ पोलीस अधिकारी विजय रमण यांचे निधन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, महापालिकेकडून नरवीर तानाजी मालुसरे समाधिस्थळ सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. समाधिस्थळाच्या दर्शनी भागातील दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. तसेच छत्रपती राजाराममहाराज समाधिस्थळ संवर्धन करण्याचे काम हाती घेण्यात येणार असून, किल्ल्यावर दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहेत. सिग्नेचर वाॅकमध्ये सहभागी होण्यासाठी http://heritage walk.pmc.gov.in या लिंकद्वारे नोंदणी करता येणार आहे.