पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षांनी बैठका, मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. त्या सर्व घडामोडींचा आढावा घेण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौर्यावर आले होते. त्यावेळी शाखा अध्यक्षांसह अन्य पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे यांची बैठक घेतली. त्या बैठकीत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सुनावल्याचे पाहण्यास मिळाले.
“नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यानंतर जिल्हा परिषद, महापालिका निवडणुका होणार आहेत, त्या दृष्टीने प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करायला सुरुवात करा, प्रत्येक मतदारांपर्यंत मनसे सैनिकांनी पोहोचा, प्रत्येक मतदार यादीवर काम करा. टाईमपास म्हणून निवडणुका लढावायच्या नाहीत, काम दाखवा; मी इकडे टाईमपास करण्यासाठी आलो नाही. तयारी नसेल तर दुसऱ्या पक्षात जा, उमेदवाराची आर्थिक परिस्थिती असो किंवा नसो त्याचं काय करायच ते मी बघतो, तसेच आज रात्रीपर्यंत तुमच्या प्रभागातील बूथ प्रतिनिधींची यादी द्या,” अशा शब्दांत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना बैठकीत सुनावले.
