पुणे : काळ्या पैशांच्या व्यवहारात डिजिटल अटक करण्याची भीती दाखवून पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची सहा कोटी २९ लाखांची फसवणूक करणाऱ्या सायबर चोरट्याला पनवेल परिसरातून अटक केली. सायबर पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. चोरट्याने डिजिटल अटक करण्याची भीती दाखवून पाच जणांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
तुषार हरिश्चंद्र वाजंत्री (वय २८, रा. कोकबन, ता. रोहा, जि. रायगड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वाजंत्री याने पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइल क्रमांकावर गेल्या वर्षी ९ नोव्हेंबर रोजी संपर्क साधला होता. त्याने पोलीस असल्याची बतावणी केली. काळ्या पैशांच्या व्यवहारात (मनी लॉंड्रिंग) कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखविली होती. याप्रकरणात डिजिटल अटक करण्यात येणार असून, ज्येष्ठाला तातडीने पैसे पाठविण्यास सांगितले. त्यानंतर ९ ते १९ नाेव्हेंबर दरम्यान ज्येष्ठाने वाजंत्री याच्या बँक खात्यात सहा कोटी २९ लाख रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठाने शिवाजीनगर सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.
सायबर पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास सुरू होता. आरोपीच्या बँक खात्याचा तपास सुरू असताना आरोपीच्या खात्यात रक्कम जमा झाल्याचे उघडकीस आले. आरोपी वाजंत्रीने ९० लाख आणि २० लाख रुपये एका बँकेत मुदतठेव स्वरूपात ठेवले होते. संबंधित बँक खाते कोकबन येथील धावीर कन्स्ट्रक्शनचे असल्याचे उघड झाले. त्यानंतर सायबर पोलिसांचे पथक आरोपी वाजंत्री आणि साथीदाराला ताब्यात घेण्यासाठी कोकबन येथे गेले. पोलीस मागावर असल्याची चाहूल लागताच तो पसार झाला. आरोपी वाजंत्री पनवेलमध्ये असल्याची माहिती खबऱ्याने दिली. सापळा लावून वाजंत्री याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी वाजंत्री याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त विवेक मासाळ, सहायक आयुक्त मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलीस कर्मचारी राजुदास चव्हाण, मुंढे, कोंडे, बाळासाहेब चव्हाण, जान्हवी भडेकर, संदीप पवार, संदीप यादव, सचिन शिंदे, सतीश मांढरे यांनी ही कामगिरी केली.
केरळ पोलीस मागावर
केरळ पोलीस सायबर चोरटा तुषार वाजंत्रीच्या मागावर होते. सायबर पोलिसांनी केरळ पोलिसांशी संपर्क साधला आहे. वाजंत्रीबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. आरोपीविरुद्ध वेगवेगळ्या राज्यात ‘नॅशनल सायबर पोर्टल’वर एकूण पाच तक्रारी दाखल आहेत. या पाच गुन्ह्यांत वाजंत्री सामील असल्याचे उघडकीस आले आहे.