पुणे : ‘जीवनामध्ये वाटचाल करताना आलेले संकट संधीची कवाडे उघडत असते. पक्षनिरपेक्ष राहूनही सामाजिक काम करता येणे शक्य आहे. तेच करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला,’ अशी भावना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ. राजा दांडेकर यांनी रविवारी व्यक्त केले.
उन्मेष प्रकाशनातर्फे सुमेध वडावाला (रिसबूड) लिखित ‘कार्यकर्ता’ या डॉ. राजा दांडेकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी दांडेकर बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष सुधीर जोगळेकर, प्रकाशक मेधा राजहंस या वेळी उपस्थित होत्या.
दांडेकर म्हणाले, ‘समाजात वावरताना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. मात्र, त्यांच्याकडे संधी म्हणून बघता आले पाहिजे. कोणतेही सामाजिक कार्य पक्षनिरपेक्षपणे करता येते. समाजाकडून मला जे मिळाले त्याबद्दल पूर्ण समाधानी आहे. आता आणखी काही मागण्याची इच्छा मला होऊ नये, हीच परमेश्वराकडे मागणी आहे.’
प्रभुणे म्हणाले, ‘समाजातील प्रत्येक वर्गासाठी डॉ. राजा दांडेकर यांनी भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या कामातून प्रत्येक कार्यकर्त्याला प्रेरणा मिळते. डॉ. दांडेकर यांच्या समवेत झालेल्या चर्चांमधून आणि त्यांनी केलेले काम पाहूनच मलाही कामाची दिशा सापडली.’
कुवळेकर आणि जोगळेकर यांनी आपल्या मनोगतातून दांडेकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि पुस्तकाचे विविध पैलू उलगडले. वडावाला यांनी लेखनामागची भूमिका मांडली. राजहंस यांनी प्रास्ताविक केले. संगीता पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले.