पुणे : चिमणी संवर्धनाच्या मोहिमेत गावकऱ्यांना सहभागी करून घेण्याचा प्रयोग श्रीनिवासन सर्व्हिसेस ट्रस्टने केला आहे. या प्रयोगाला १०० गावांमध्ये यश आल्याने आणखी २०० गावांमध्ये ही मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेत गावांमध्ये चिमण्यांसाठी पूरक वातावरण निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. यामुळे चिमण्यांची संख्या वाढण्यास मदत होत आहे.

श्रीनिवासन सर्व्हिसेस ट्रस्टकडून गेल्या वर्षी १०० गावांमध्ये चिमणी संवर्धन मोहीम राबविण्यात आली. यात महाराष्ट्रासह तमिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील गावांचा समावेश आहे. या गावांतील हजारो कुटुंबीयांना ट्रस्टकडून चिमण्यांची कृत्रिम घरटी वितरित करण्यात आली. याचबरोबर चिमण्यांसाठी पूरक वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात आला. यामुळे गावकरी प्रत्यक्षपणे चिमणी संवर्धन मोहिमेत सहभागी झाले आणि त्यांचे चांगले परिणाम दिसून आले.

हेही वाचा : छेडछाडीमुळे महाविद्यालयीन युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न, भारती विद्यापीठ परिसरातील घटना

या मोहिमेत गावांमध्ये बैठका घेऊन चिमण्या संवर्धनाबाबत जनमत तयार करण्यात आले. तसेच गावातील स्वयंसेवक तयार करून त्यांना सहभागी करण्यात आले. लहान मुलांमध्ये चिमण्यांबाबत उत्सुकता निर्माण करण्यासाठी चित्रकला स्पर्धाही घेण्यात आल्या. गावकऱ्यांना या मोहिमेत जास्तीत जास्त सहभागी करून घेण्याबद्दल ट्रस्टकडून प्रयत्न करण्यात आले. या मोहिमेला १०० गावांमध्ये मिळालेला प्रतिसाद पाहून आणखी २०० गावांमध्ये ही मोहीम राबविण्याचा निर्णय आता ट्रस्टने घेतला आहे.

हेही वाचा : पुणे: स्थानकांच्या नावातून मेट्रो मालामाल! वर्षाला कोट्यवधींची कमाई; जाणून घ्या महामेट्रोचा फंडा

चिमण्यांचे संवर्धन हे एकट्याचे काम नसून, ती सामाजिक जबाबदारी आहे. त्यामुळे समाजात याबाबत जनजागृती करून जास्तीत जास्त जणांना यात सहभागी करून घेतले जात आहे. चिमणी संवर्धन मोहीम जैवविविधतेच्या रक्षणासाठी आवश्यक आहे.

स्वरण सिंग, अध्यक्ष, श्रीनिवासन सर्व्हिसेस ट्रस्ट