पुणे : घरासमोर गांजा ओढणाऱ्या सराइतांना हटकल्याने दुचाकींची जाळपाेळ केल्याची घटना नगर रस्त्यावरील वाघोली भागात घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी गणेश दांडे, श्रृतिक येरकर, सूरज पवार, समीर पिल्ले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सुधीर लक्ष्मण पेटकर (वय ३४, रा. वाघोली, नगर रस्ता) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दांडे, येरकर, पवार, पिल्ले पेटकर यांच्या घराच्या परिसरात गांजा ओढत होते. पेटकर कुटुंबीयांना त्रास झाल्याने त्यांनी आरोपींना गांजा ओढू नका, असे सांगितले होते. शनिवारी मध्यरात्री पेटकर कुटुंबीय गाढ झोपेत होते. त्यावेळी घराच्या परिसरातून जळण्याचा वास आला. पेटकर यांनी घराबाहेर डोकावून पाहिले. तेव्हा दुचाकी पेटवल्याचे लक्षात आले. त्यानंतर स्थानिक रहिवाशांनी पाणी ओतून आग आटोक्यात आणली.

हेही वाचा : बांगलादेशातील हिंदुंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये मोर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेची माहिती लोणीकंद पोलिसांना देण्यात आली. घरासमोर गांजा ओढण्यास मनाई केल्याने आरोपींनी दुचाकी पेटविल्याचे पेटकर यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांकडून पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.