पुणे : समाजमाध्यमातील आक्षेपार्ह मजकुरामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत गावात शुक्रवारी तणाव निर्माण होऊन दगडफेक करण्यात आली. माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यवतमधील तणावाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले.
दौंड तालुक्यातील यवत गाव परिसरात समाजमाध्यमातील आक्षेपार्ह मजकुरामुळे शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास तणाव निर्माण झाला. दोन गट समोरासमोर आले. जमावाकडून दगडफेक करण्यात आली. त्यामुळे परिस्थिती चिघळली. या घटनेची माहिती यवत पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याचे पाहून पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयातून अतिरिक्त कुमक मागविण्यात आली.
जमावाकडून घरे, दुकाने, तसेच प्रार्थनास्थळावर दगडफेक करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. सौम्य लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणली. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त अधीक्षक गणेश बिरादार, रमेश चोपडे यांनी घटनास्थळी भेट देऊन जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले.
पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे गंभीर घटना टळली
समाजमाध्यमात आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणारा युवक गावातील सहकारनगर भागात वास्तव्यास आहे. आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्या युुवकाच्या घरावर जमावाने हल्ला केला. पोलिसांनी तेथे धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. दगडफेकीत घराचे मोठे नुकसान झाले. या घटनेत कोणी जखमी झाले नाही. २६ जुलै रोजी गावात पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली होती. तेव्हापासून परिसरात तणावाची परिस्थिती होती. त्यानंतर शुक्रवारी सकाळी आक्षेपार्ह मजकुरामुळे वादाची ठिणगी पडली. संतप्त जमावाने दुचाकी पेटवून दिल्या. यवत गावात पोलिसांनी मोठा बंदाेबस्त ठेवला आहे.
यवत गावात मोठा बंदोबस्त
गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर बंदाेबस्तात वाढ करण्यात आली. शुक्रवारी गावात आठवडे बाजार असतो. तणावामुळे तो बंद ठेवण्यात आला. सायंकाळी पोलिसांनी ‘रुट मार्च’ काढून जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले. आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांच्या सायबर सेलच्या पथकाने समाजमाध्यमांवर नजर ठेवली आहे. आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करण्यात आल्यानंतर यवत गावात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्यास, तसेच कायदा-सुव्यवस्थेला गालबोट लावणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. – संदीपसिंग गिल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण पोलीस