पुणे : पोलिसांच्या हातावर तुरी देऊन धावत्या रेल्वेतून सराईत गुन्हेगार पसार झाल्याची घटना हावडा-पुणे दुरंतो रेल्वेगाडीत घडली. नागपूर ते बुटीबोरी दरम्यान ही घटना घडली.

संजय तपनकुमार जाना (रा. गोपीनाथ भीतरजाल, पश्चिम बंगाल) असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे. फरासखाना पोलीस ठाण्यात ६ मे रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय जाना आणि सौरभ प्रसन्नजीत माईती दागिने घडविणाऱ्या कारागिराकडे कामाला होते. दागिने घडविण्यासाठी दिलेले ३८१ ग्रॅम सोने घेऊन दोघेजण पसार झाले होते.

हेही वाचा – नंदूरबार, धुळे, नाशिकला हवामान विभागाचा इशारा; दुपारनंतर वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुणे पोलिसांचे पथक त्यांना पकडण्यासाठी पश्चिम बंगालला रवाना झाले होते. संजय जाना याला घेऊन फरासखाना पोलिसांचे पथक पुण्याकडे हावडा – पुणे दुरंतो एक्सप्रेसमधून पुण्याकडे येत होते. शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास संजय जाना याने प्रसाधनगृहात जाण्याची बतावणी पोलिसांकडे केली. संजयने प्रसाधनगृहाचा दरवाजा आतून बंद केला. बराच वेळ झाल्याानंतर तो प्रसाधनगृहातून बाहेर आला नाही. पोलिसांनी दरवाजा वाजविला. मात्र, त्याने प्रतिसाद दिला नाही. पोलिसांना संशय आला. पोलिसांनी दरवाजा उघडला. तेव्हा आरोपी संजय प्रसाधनगृहातील खिडकीची काच फोडून पसार झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी नागपूर रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.