Theft Case In Pune पुणे : गणेशोत्सव काळात पोलिसांचा पहारा असतानाही शहराच्या विविध भागात सोनसाखळी आणि मोबाईल चोरीच्या घटना घडत आहेत, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यास आलेल्या महिलेचे मंदिराच्या गाभाऱ्यातून ७५ हजारांचे मिनी मंगळसूत्र चोरल्याची घटना घडली आहे. यासोबतच तीन घटनांची नोंद पोलिसाकंडे झाली असून लष्कर, भारती विद्यापीठ, विश्रामबाग तसेच येरवड्यात या घटना घडल्या आहेत.

याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात २९ वर्षीय महिलेने तक्रार दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना २ सप्टेंबर रोजी रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार या पिंपरी-चिंचवड येथून पुण्यात गणेश दर्शनासाठी आलेल्या होत्या. त्या रात्री सव्वाआठच्या सुमारास श्रीमंत दगडूशेठ हलवाईचे दर्शन घेण्यासाठी आत गेल्या. गाभाऱ्यात असतानाच चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ७५ हजार रुपयांचे मिनी मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून चोरले. दरम्यान, गर्दीचा फायदा घेऊन चोरटे तेथून पसार झाले.

येरवडा परिसरात १७ वर्षीय

पादचारी मुलाच्या गळ्यातील सोनसाखळी तसेच त्याच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वार चोरट्यांनी जरबदस्तीने हिसकावून चोरून नेल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यामध्ये दोघांवर गुन्हा नोंद झाला आहे. २ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली.

तिसऱ्या घटनेत ७३ वर्षीय ज्येष्ठ

 महिला लष्कर परिसरातील खाण्या मारूती चौकात फळ खरेदीसाठी आली असता दोन महिलांनी त्यांच्या हातामध्ये असलेल्या पर्समधील २० हजारांची रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी लष्कर पोलिसांत दोन अनोळखी महिलांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

बस प्रवासात सव्वादोन लाखांच्या दागिन्यांची चोरी

कात्रज बसस्टॉप ते भारती विद्यापीठ पोलीस ठाणे या काही मिनिटांच्या अंतरात बस प्रवासी महिलेच्या बॅगेतील तब्बल दोन लाख १९ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलसीस ठाण्यात ५९ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. ही घटना ३ सप्टेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली.