पुणे : शहरात सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरू असून, वातावरण ढगाळ आहे. खराब हवेमुळे आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. लहान मुलांमध्ये तापाची साथ सुरू असून, मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यतज्ज्ञांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
‘पावसाळ्यातील खराब हवेमुळे लहान मुलांमध्ये विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. त्यात ताप, सर्दी, खोकला, अतिसार अशी लक्षणे दिसून येत आहेत. यामुळे लहान मुलांना दर वर्षी फ्लूची लस देणे आवश्यक आहे. आता शाळा सुरू झाल्या आहेत. लहान मूल आजारी पडल्यास त्याला शाळेत पाठविणे टाळा. कारण, ते शाळेत इतर मुलांच्या संपर्कात येऊन त्यांनाही विषाणूजन्य आजारांचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण होतो. त्याचबरोबर मुले आजारी पडल्यास त्यांना मुखपट्टी वापरण्यास द्यावी. मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये लहान मुलांमध्ये विषाणूजन्य आजारांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे,’ असे बालरोगतज्ज्ञ डॉ. दिलीप सारडा यांनी सांगितले.
‘पावसाळ्यात बदलत्या वातावरणामुळे लहान मुलांची रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. शाळेत एकमेकांच्या सहवासात आल्याने विशेषत: या काळात लहान मुलांना पटकन सर्दी, खोकला, ताप, जुलाब अशा समस्या उद्भवतात. गेल्या काही दिवसांत लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रामुख्याने २ ते १० वर्षे वयोगटातील मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण जास्त आहे. दूषित पाणी, तापमानात झालेली घट आणि अस्वच्छता यामुळे संसर्गाचा धोका अधिक वाढतो,’ असे बालरोगतज्ज्ञ डॉ. अतुल पालवे यांनी नमूद केले.
ज्येष्ठांमध्येही तक्रारींत वाढ
‘ढगाळ हवामानामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये अनेक तक्रारी दिसून येत आहेत. श्वसनविकाराच्या रुग्णांचा आजार खराब हवेमुळे बळावतो. ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढू लागले आहेत. ज्येष्ठांमध्ये अंगदुखी, पाठ भरून येणे अशा तक्रारी ढगाळ हवेमुळे वाढल्या आहेत. त्यामुळे पावसात भिजणे टाळावे. ताप आल्यास तो अंगावर काढू नये. डॉक्टरांना दाखवून योग्य उपचार घ्यावेत,’ असे आरोग्यतज्ज्ञ डॉ. अविनाश भोंडवे यांनी स्पष्ट केले.
काळजी काय घ्यावी?
– ताप आल्यास तातडीने डॉक्टरांना दाखवावे.
– पावसात भिजणे टाळावे.
– श्वसनविकाराच्या रुग्णांनी नियमित औषधे घ्यावीत.
– बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे.
– डासांपासून संरक्षण होईल, असे कपडे परिधान करावेत.
– पाणी उकळून आणि नंतर थंड करून प्यावे.