पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढत असल्याने नांदेड आणि लातूरसाठी हडपसर रेल्वे स्थानकावरून रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. २६ जानेवारी २०२६ पासून याची अंमलजावणी करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.पुणे स्थानकावरून दररोज १२७ गाड्यांचे प्रस्थान आणि १२७ गाड्यांचे आगमन होते. त्यातून दररोज दीड ते दोन लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे पूर्वेकडे जाणाऱ्या गाड्यांचे हडपसर स्थानकावरून, तर उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्यांचे खडकी स्थानकावर येण्या-जाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पुणे, हडपसर, शिवाजीनगर, खडकी स्थानकांचे विस्तारीकरण आणि पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. हडपसर आणि खडकी स्थानकांच्या विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. टप्प्याटप्प्याने या स्थानकांवरून गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यानुसार नांदेड आणि लातूर येथे जाणाऱ्या आणि येणाऱ्या गाड्या २६ जानेवारीपासून हडपसर स्थानकावरून सोडल्या जाणार आहेत.
गाड्यांचे वेळापत्रक आणि मार्ग
हडपसर-नांदेड-हडपसर एक्स्प्रेस (१७६२९-३०) दररोज रात्री ९.५० वाजता हडपसरहून निघेल. नांदेड-हडपसर एक्स्प्रेस दररोज पहाटे ४.३५ वाजता हडपसर स्थानकात येईल. यापुढे ही गाडी पुणे स्थानकात थांबणार नाही. त्यामुळे थांब्यांमध्येही बदल केले असून लोणी, उरुळी, येवत, केडगाव, पाटस आणि दौंड कॉर्ड लाईन या स्थानकांवरील वेळेत बदल झाला आहे. हडपसर-हरंगूल-एक्स्प्रेस (०१४८७/८८) दररोज सकाळी ६.२० वाजता हडपसरहून निघेल आणि येणारी गाडी रात्री ८.४५ वाजता हडपसरला पोहोचेल.
पुणे रेल्वे स्थानकावरील गाड्यांची संख्या, प्रवाशांची वाढती गर्दी आणि वाहतूक व्यवस्थापनाच्या दृष्टीने टर्मिनलचे विकेंद्रीकरण करण्याचे नियोजन होते. त्यानुसार २६ जानेवारी २०२६ पासून नांदेड आणि लातूरला जाणाऱ्या-येणाऱ्या गाड्या हडपसर स्थानकावरून सोडण्यात येणार आहेत. पुणे स्थानकावरील गाड्या हडपसर मार्गावरून सोडण्याचे नियोजन असून, टप्प्याटप्प्याने स्थलांतरीत करण्याचे नियोजन आहे. हेमंतकुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग
