पुणे : लहान मुलांमध्ये कॅल्शिअम अथवा ड जीवनसत्त्वासोबतच आता बी-१२ जीवनसत्त्वाची कमतरता आढळून येत आहे. या कमतरतेचे निदान होणाऱ्या मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुलांमध्ये थकवा, हाता-पायाला मुंग्या येणे, भूक न लागणे आणि त्वचेचा रंग फिका पडणे अशी लक्षणे दिसून येत आहे. पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, असा सल्ला बालरोगतज्ज्ञांनी दिला आहे.
मुलांच्या विकासात बी-१२ जीवनसत्त्व महत्त्वाची भूमिका बजावते. ते मेंदूच्या कार्यास चालना देते. लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करते. मुलांमधील चेतासंस्थेच्या विकासासाठी ते आवश्यक असते. अशा परिस्थितीत बी-१२ ची कमतरता चेतासंस्थेशी निगडित समस्या निर्माण करू शकते. बी-१२ चा मुख्य स्रोत दूध, अंडी, मांस आणि मासे यांसारखे पदार्थ आहेत. शाकाहार घेणाऱ्या आणि आहाराच्या चुकीच्या सवयी असलेल्या मुलांमध्ये बी-१२ची कमतरता प्रामुख्याने दिसून येत आहे.
याबाबत मदरहूड हॉस्पिटलमधील (खराडी) बालरोगतज्ज्ञ डॉ. तुषार पारीख म्हणाले, की दर महिन्याला ४-१० वयोगटातील अंदाजे १० ते १२ मुले ही बी-१२च्या कमतरतेसह आणि थकवा, स्नायूंचा कमकुवतपणा यांसारख्या लक्षणांसह भेटतात. नियमितपणे चाचणी केलेल्या ३० टक्के प्रकरणांमध्ये बी-१२ ची कमतरता आढळून आली. त्यानुसार त्वरित व्यवस्थापन करण्याचा सल्ला देण्यात आला. बी-१२ च्या कमतरतेवर वेळीच लवकर उपचार न केल्यास गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. मुलांमध्ये रक्तचाचणीद्वारे या कमतरतेचे निदान केले जाऊ शकते. बी-१२ ची पातळी खूप कमी असेल, तर मुलांना पूरक आहार किंवा इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला जातो. पालकांनी मुलांना संतुलित आहार घेण्यास प्रोत्साहित करावे, त्यांना येणाऱ्या थकव्याकडे दुर्लक्ष करू नका.
बालरोगतज्ज्ञ डॉ. दिलीप सारडा म्हणाले, की लहान मुलांमध्ये बी-१२ जीवनसत्त्वाची कमतरता दिसून येत आहे. यामागे प्रामुख्याने चुकीचा आहार कारणीभूत आहे. शाकाहारी मुलांमध्ये दूध हा बी-१२ चा प्रमुख स्रोत असतो. मात्र, पाश्चरायझेशन आणि दूध उकळल्यामुळे त्यातील बी-१२ चे प्रमाण कमी होते. त्यामुळे दूध पिऊनही मुलांना त्यातून या जीवनसत्त्वाचा पुरेसा पुरवठा होत नाही. हे टाळण्यासाठी मुलांच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा अधिकाधिक समावेश करावा. मांसाहारी मुलांसाठी अंडी, मासे, चिकन, मटण याचा समावेश आहारात करावा. त्यातून त्यांची बी-१२ची कमतरता भरून येऊ शकते. मुलांच्या वाढीच्या वयात या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. त्यामुळे पालकांनी वेळीच याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
मुलांमधील बी-१२ च्या कमतरतेची लक्षणे
- थकवा आणि ऊर्जेची पातळी कमी होणे.
- भूक न लागणे अथवा मंदावणे.
- बोलण्यात किंवा विकासात विलंब होणे.
- त्वचा फिकी अथवा निस्तेज पडणे.
- चिडचिडेपणामध्ये वाढ होणे.
- हाता-पायांना मुंग्या अथवा बधिरपणा येणे.
- लक्ष केंद्रित करण्यात अथवा शिकण्यात अडचण येणे.