पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए) प्रमुख म्हणून व्हाइस ॲडमिरल अनिल जग्गी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते प्रमुख व्हाइस ॲडमिरल गुरचरण सिंग यांच्याकडून जग्गी यांनी नियुक्ती स्वीकारली.

भारतीय नौदल अकादमीचे (आयएनए) माजी विद्यार्थी असलेले ॲडमिरल अनिल जग्गी १ जानेवारी १९९३ रोजी भारतीय नौदलात रुजू झाले. गेल्या तीन दशकांहून अधिक वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध कार्यालयीन, राजनैतिक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांनी क्षेपणास्त्र जहाज आयएनएस वीर, तसेच स्वदेशी शिवालिक श्रेणीतील स्टेल्थ गाईडेड मिसाइल फ्रिगेट आयएनएस सह्याद्रीचे नेतृत्व केले आहे.

वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, गोव्यातील प्रतिष्ठित नेव्हल वॉर कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले आहे. करिअर अभ्यासक्रमांव्यतिरिक्त जग्गी यांनी स्वीडनमधील स्वेडिन्ट येथून संयुक्त राष्ट्र निरीक्षक अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे.

शैक्षणिक संस्थांवरील नियुक्त्यांमध्ये त्यांनी इंडियन नेव्हल अकादमी येथील विभागीय अधिकारी, वेलिंग्टन येथील डीएसएससी येथील प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. त्याशिवाय, कमोडोर पदावर त्यांनी भारतीय उच्चायुक्तालयात नौदल सल्लागार, तसेच नवी दिल्ली येथील नौदल मुख्यालय येथे कमोडोर (परदेशी सहकार्य) म्हणून काम करताना परराष्ट्र सहकार्य, आंतरराष्ट्रीय संबंधांबाबत समृद्ध आणि मौलिक अनुभव मिळवला.

रियर ॲडमिरल पदावर बढती झाल्यानंतर त्यांना गुजरात, दमण आणि दीव नौदल क्षेत्राचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. एनडीएच्या प्रमुख पदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी ते महाराष्ट्र नौदल क्षेत्राचे प्रमुख होते. तिथे त्यांनी महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागाच्या संरक्षणाची जबाबदारी सांभाळली.

तसेच, पश्चिम नौदल मुख्यालयाच्या अखत्यारीत प्रशासन, पायाभूत सुविधा प्रकल्प, नौदल समुदायाचे कल्याण यासंबंधी विविध उपक्रम राबवले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्र राज्य आणि नागरी संस्थांशी समन्वय साधून सामुदायिक सहभाग, संपर्क कार्यक्रम आणि नागरी-लष्करी संपर्क उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभाग घेतला.

व्हाइस ॲडमिरल अनिल जग्गी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या माध्यमातून भारतीय सशस्त्र दलांच्या भावी नेत्यांना उत्तमरीत्या प्रशिक्षित करण्याचा प्रतिष्ठित वारसा कायम ठेवला जाणार आहे. तीन सेवांचे प्रशिक्षण देणाऱ्या या संस्थेत त्यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली मजबूत संयुक्त प्रशिक्षण नीतिमत्ता जपण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.