पुणे : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात हाॅटेल व्यावसायिकाला धमकावून गोळीबार, खंडणी मागणे, तसेच दहशत माजविणारा गुंड मयूर हजारेसह साथीदारांविरुद्ध विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्याचे आदेश दिले.

मयूर तानाजी हजारे (रा.कणेरसर, ता. खेड, जि. पुणे), अक्षय बबन हजारे (रा. कणेरसर, ता. खेड, जि. पुणे), राहुल उर्फ बंटी साहेबराव डफळ (वय ३५,रा. धामारी, ता. शिरुर, जि. पुणे), गणेश दिलीप गोरडे (वय २३, रा. पूर, ता. खेड, जि. पुणे), मंगेश विलास दौंडकर (वय ३५, रा. कणेरसर, ता. खेड, जि. पुणे), स्वप्नील रोहिदास गावडे (वय ३०, रा. पूर, ता. खेड, जि. पुणे), शुभम शिवाजी हजारे (वय २१), गौरव राम हजारे (वय २०, रा. कणेरसर, ता. खेड, जि. पुणे) अशी ‘मकोका’ कारवाई केलेल्या गुंडांची नावे आहेत. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर मयूर हजारे, अक्षय हजारे हे फरार झाले आहेत. दहा आरोपींविरुद्ध खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

मयूर हजारे याच्यासह साथीदारांविरुद्ध खेड आणि शिक्रापूर पोलीस ठाण्यात दहशत माजविणे, बेकायदा पिस्तूल बाळगणे, खून, पिस्तुलाचा धाक दाखवून खंडणी मागणे, खुनाचा प्रयत्न असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. १० मे २०१५ रोजी मयूर हजारे आणि साथीदार खेड तालुक्यातील गोसासी गावात असलेल्या एका हाॅटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते.

हाॅटेल चालकाने त्यांच्याकडे बिल मागितल्याने आरोपींनी त्याला मारहाण केली होती. त्यानंतर हाॅटेल व्यावसायिकाकडे दरमहा हप्ता देण्याची मागणी करून मयूर हजारेने पिस्तुलातून दोन गोळ्या झाडून दहशत माजविली होती. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हजारे याच्यासह साथीदारांविरुद्ध ‘मकोका’ कारवाई करण्याचा प्रस्ताव पुणे ग्रामीण पोलिसांनी तयार केला. काेल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिली. पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, सहायक निरीक्षक सिसोदे, महेश बनकर, शंकर भवारी, संदीप लांडे, विक्रमसिंह तापकीर, राजू मोमीन, मंगेश थिगळे, जनार्दन शेळके, तुषार पंदारे यांनी ही कारवाई केली. उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे तपास करत आहेत.

पुणे जिल्ह्यातील तीन टोळ्यांना ‘मकोका’

पुणे ग्रामीण पोलिसांनी पंधरा दिवसात पुणे जिल्ह्यातील वालचंदनगर, वडगाव मावळ, तसेच खेड तालुक्यातील तीन गुंड टोळ्यांविरुद्ध ‘मकोका’ कारवाई केली आहे.