पुणे : जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शिक्षकांच्या गेल्यावर्षीच्या आंतरजिल्हा बदल्यांमधील विनंती बदली न मिळालेल्या शिक्षकांना जागा रिक्त होतील तशी बदली देण्यात येईल. त्यानंतर आंतरजिल्हा बदली पूर्णतः बंद करण्याची तरतूद ग्रामविकास विभागाने बदली धोरणात करावी, तसेच अवघड क्षेत्राच्या निकषांचे पुनर्विलोकन करून सुधारित निकषांचा समावेश बदली धोरणामध्ये करावा निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत.
बऱ्याच जिल्ह्यांमध्ये शिक्षक नियुक्तीनंतर सोयीच्या जिल्ह्यांत बदलीसाठी प्रयत्नशील असल्याने बदल्यांमुळे जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त राहतात. त्यामुळे कोणत्याही शाळेतील शिक्षकांची १० टक्केपेक्षा जास्त पदे रिक्त राहू न देण्याबाबत आरटीईतील तरतुदीचे पालन करणे अशक्य झाले आहे. काही जिल्ह्यांमध्ये शिक्षकांची पदे अतिरिक्त तर काही जिल्ह्यांमध्ये पदे रिक्त राहात आहेत. त्यामुळे शिक्षक भरतीसाठी रिक्त पदांची संख्या निश्चित करणे, रिक्त पदांवर नियुक्ती देण्यासाठी सुधारित नियम लागू करण्याचा शासन स्तरावर विचार सुरू होता. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाकडून शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला.
जिल्हातंर्गत बदलीसाठी इच्छुकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देऊन जागा रिक्त असल्यास समुपदेशानाद्वारे नियुक्ती द्यावी, समुपदेशनापूर्वी संभाव्य भरण्यात येणाऱ्या नवीन पदांचा विचार करून शाळांमध्ये समान शिक्षक राहतील याची दक्षता घ्यावी, बदलीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आधार प्रमाणित संचमान्यतेनुसार रिक्त पदांची मागणी पवित्र प्रणालीवर करावी, मागणी करण्यात आलेल्या रिक्तपदांच्या ८० टक्के पदे बिंदू नामावलीप्रमाणे भरण्यासाठी पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक उपलब्ध होतील. नव्याने नियुक्ती झाल्यावर अशा शिक्षकांना जिल्हा बदलीचा हक्क राहणार नाही. मात्र नव्याने नियुक्तीनंतर इतर जिल्ह्यात जाऊ इच्छिणाऱ्या शिक्षकाने राजीनामा देऊन पुन्हा प्रक्रियेच्या माध्यमातून शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी देऊन गुणवत्तेच्या आधारे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक म्हणून नियुक्ती मिळवणे आवश्यक राहील असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा >>> पुणे : परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीसाठी ५ जुलैपर्यंत मुदतवाढ
जिल्हातंर्गत, वैद्यकीय कारणास्तव, तक्रारीच्या अनुषंगाने अथवा पती-पत्नी एकत्रिकरणातंर्गत अशा अपवादात्मक प्रकरणी करावयाच्या बदलीसाठी ग्रामविकास विभागाने धोरण ठरवावे. पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक उपलब्ध झाल्यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी समुपदेशनाद्वारे शिक्षकांच्या नियुक्तीसाठी शालेय शिक्षण विभागाने कार्यप्रणाली ठरवली आहे. त्यानुसार रिक्त पदांची यादी करून अपंग उमेदवारांना अभियोग्यता चाचणीतील गुणानुक्रमानुसार प्राधान्य देऊन त्यांच्या मागणीनुसार यादीतील शाळांमध्ये नियुक्ती द्यावी, त्यानंतर महिला उमेदवार आणि सर्वसाधारण उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.