पुणे : जुन्या वाहनांना ‘उच्च सुरक्षा क्रमांक पाटी’ (एचएसआरपी) बसविण्यासाठी पुणे शहरातील वाहनधारकांकडून कमी प्रतिसाद मिळाल्याचे समोर आले आहे. शहरातील २५ लाख वाहनांपैकी गुरुवारपर्यंत केवळ साडेचार लाख वाहनांचीच ऑनलाइन नोंदणी करण्यात आली, तर दोन लाख ८ हजार वाहनांना ही पाटी बसविण्यात आली आहे. उर्वरित वाहनधारकांनी ३० जूनच्या आत उच्च सुरक्षा क्रमांकाची पाटी बसवून घ्यावी. अन्यथा संबंधित वाहनधारकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा पुणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) देण्यात आला आहे.
परिवहन विभागाच्या निर्देशानुसार १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना ३० जूनपर्यंत ‘उच्च सुरक्षा क्रमांक पाटी’ लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. पुणे शहरात २५ लाख जुनी वाहने असून, त्यासाठी शहरात १५० हून अधिक केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. तसेच, वाहनधारकांना नोंदणीसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु, नागरिकांकडूनच या सुविधेला अल्प प्रतिसाद मिळत आहे. गुरुवारपर्यंत चार लाख ६० हजार ५७८ जणांनी नोंदणी केली आहे, दोन लाख ८ हजार ३४९ वाहनांना ही पाटी बसविण्यात आली आहे, तर तीन लाख ५५ हजार ४२५ वाहनांनी ही पाटी बसविण्यासाठी वेळ आरक्षित केली आहे.
‘अद्याप २२ लाख वाहनांना पाटी बसविण्याबाबत वाहनधारकांकडून कुठलीच नोंद केलेली नाही. ३० जूनपर्यंत वाहनधारकांनी ऑनलाईन नोंदणी करून वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाटी बसवून घ्यावी,’ असे आवाहन आरटीओ अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.परिवहन विभागाच्या आदेशानुसार ज्या वाहनधारकांनी मुदतीत उच्च सुरक्षा क्रमांक पाटी बसवून घेतली नाही, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.- स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे