पिंपरी : सुनेचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात पसार असलेला राजेंद्र हगवणे, पुत्र सुशील हगवणे यांनी सात दिवस पुणे जिल्ह्यातील मावळ, आळंदी आणि सातारा येथे फार्म हाऊस, लॉज, शेतावर मुक्काम केल्याचे समोर आले आहे. दोघांनी आलिशान मोटारीतून पुणे-सातारा प्रवास केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
राजेंद्र आणि सुशील हगवणे सात दिवस वेगवेगळ्या हॉटेलांत राहिले आणि त्यांनी आलिशान मोटारीतून प्रवास केला. वैष्णवी यांनी १६ मे रोजी सायंकाळी आत्महत्या केली. त्यानंतर त्यांचा मृतदेह औंध येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला गेला. राजेंद्र आणि सुशील हगवणे १७ मे रोजी औंध रुग्णालयात आले होते. वैष्णवी यांचा मृतदेह पाहिल्यानंतर अटकेची कारवाई होऊ शकते या भीतीने दोघांनी मोटार बदलली आणि तेथून पलायन केले. सुरुवातीला बावधन येथील एका लॉजवर गेले. तेथून वडगाव मावळ येथे गेले. त्यानंतर पवना धरण परिसरातील एका फार्म हाऊसवर त्यांनी मुक्काम केला. १८ मे रोजी पवना धरण परिसरातून आळंदीला गेले. ते पुन्हा वडगाव मावळ येथे गेले. १९ मे रोजी सातारा जिल्ह्यातील पुसेगावच्या दिशेने रवाना झाले. त्यानंतर पसरणीमार्गे कोगनोळी येथे १९ आणि २० मे रोजी एका हॉटेलमध्ये मुक्काम केला. त्यानंतर २१ आणि २२ मे रोजी एका मित्राच्या शेतावर मुक्काम केला. त्यानंतर २२ मे रोजी रात्री ते पुण्याच्या दिशेने रवाना झाले.
दरम्यान, मावळमधील एका हॉटेलमध्ये जेवण करतानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून नाकाबंदी केली. त्या वेळी ते दोघे जण २३ मे रोजी पहाटे स्वारगेट येथे आले असल्याची माहिती बावधन पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना स्वारगेट येथून अटक केली.
दोघेही पिता-पुत्र पुणे जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर फिरत होते. त्यांनी आणखी कुठे प्रवास केला, स्वारगेट येथे ते का गेले होते, त्यांना कोणी मदत केली, याबाबतचा तपास सुरू आहे.- अनिल विभुते, पोलीस निरीक्षक, बावधन पोलीस ठाणे बावधन पोलीस ठाणे