‘झी मराठी’ वाहिनीवर सुरू असलेल्या ‘जय मल्हार’ या मालिकेचा परिणाम जेजुरी गडावर पाहायला मिळत आहे. ही मालिका सुरू झाल्यापासून गडावर येणाऱ्या भाविकांच्या गर्दीने उच्चांक केला असून, त्यांची संख्या नेहमीच्या तुलनेत जवळपास दुपटीपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे येथील व्यवसायांनाही आता तेजीचे दिवस आले आहेत.
वीस वर्षांपूर्वी पाच हजारांच्या आसपास लोकसंख्या असणारी जेजुरी हे एक खेडेगाव होते. आता जेजुरीची लोकसंख्या २० हजारांच्या आसपास पोहोचली आहे आणि गावाची शहरीकरणाकडे वाटचाल सुरू आहे. या प्रगतीच्या काळातच ‘जय मल्हार’ मालिका सुरू झाल्याने जेजुरी ‘सोन्याहून पिवळी’ झाली आहे. प्रसिध्द निर्माते व दिग्दर्शक महेश कोठारे यांनी तयार केलेली ‘जय मल्हार’ मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. त्यामुळे खंडोबा गड आणि कडेपठारच्या डोंगरावर भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. मंदिरातील दर्शन पासाच्या उत्पन्नातही घसघशीत वाढ झाली आहे.
एरवी ग्राहकांची वाट पाहणारे भंडारा-खोबरे विक्रेते, पुजारी, हॉटेल व्यावसायिक व इतर दुकानदार या मंडळींना आता बोलायलाही उसंत नाही. गडावर अभिषेक, महापूजा, तळी-भंडारा, नवेद्य आदी धार्मिक विधी करावयाचे असतील तर क्षेत्रोपाध्ये गुरुजींची आधीच वेळ घ्यावी लागत आहे. मिळेल त्या वाहनाने भाविकांचे लोंढेच्या लोंढे जेजुरीत येत आहेत. त्याचबरोबर जेजुरीसाठी असणाऱ्या एस.टी. बसेस, रेल्वेही भाविकांसाठी अपुऱ्या पडत आहेत. रविवारी तर सुमारे एक लाखाच्या आसपास भाविकांची गर्दी असते. रोज सायंकाळी सहाच्या पुढे शांत होणारी जेजुरी आता मात्र रात्री १० पर्यंत गजबजलेली असते. पूर्वीपासून खंडोबाच्या दर्शनासाठी फक्त मराठी भाविकच येत. परंतु, आता महाराष्ट्राबरोबरच इतर राज्ये व परदेशातूनही सर्वधर्मीय भाविक खंडोबागडावर येताना दिसत आहेत. भाविकांच्या वाढत्या गर्दीचा ताण नगरपालिका, देवस्थान व पोलिस प्रशासनावर पडत आहे. गावात पालिकेचे वाहनतळ नसल्याने जागोजागी वाहने रस्त्यात उभी राहतात व त्यामुळे वाहतूक कोंडी होते आहे.

देवस्थान ट्रस्टचे दुर्लक्ष
येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली की भक्तांच्या देणगीतून सोया-सुविधा उभ्या राहतात. सोयी आहेत म्हणून जादा भाविक येतात. असे चित्र इतर देवस्थांनांमध्ये दिसते. परंतु जेजुरी त्याला अपवाद आहे याचे कारण सध्या जेजुरीतील विश्वस्त मंडळामधील चव्हाट्यावर आलेले वाद-विवाद व त्यामुळे खुंटलेला विकास. भाविकांसाठी सुसज्ज दर्शन मंडप, भव्य अन्नछत्र केंद्र, सुरक्षा व्यवस्था, झटपट दर्शन व्यवस्था, पिण्यासाठी शुद्ध पाणी आदी व्यवस्था अद्याप तरी कागदावरच आहेत.

‘जय मल्हार’ मालिकेत देवदत्त नागेने हातात अवजड तलवार (खंडा) घेऊन साकारलेली खंडोबाची भूमिका याशिवाय इतरही भूमिका साकारणाऱ्या कलावंतांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले आहे. खंडोबा गडावर वीरभद्र, हेगडीप्रधान, साक्षी विनायक व बाणाई यांची मंदिरे आहेत. येथे येणारे भाविक आता आवर्जून यांचे दर्शन घेताना दिसतात. खंडोबाची धाकटी बायको बाणाई हिचे मंदिर गडाच्या अध्र्या वाटेवर असून तिला सामिष नवेद्य (मेंढा,बकरा) दाखविला जातो. पूर्वीपासून बाणाईचे मंदिर तसे उपेक्षितच होते, परंतु आता मालिकेत दाखवलेल्या बाणाईच्या शिवभक्तीमुळे या मंदिरातसुद्धा दर्शनासाठी मोठी रांग लागत आहे.

‘‘आमच्या भागामध्ये संध्याकाळी सात वाजता बहुतांश घरांमध्ये ‘जय मल्हार’ मालिका मोठ्या श्रध्देने पाहिली जाते. मालिकेमुळे आम्हाला खंडोबाबद्दल बरीच माहिती मिळाली.’’
– किशोर थिटे (खंडोबाभक्त, भाईंदर)

‘‘पूर्वी लग्नसराई व शालेय सुट्टया या काळात हॉटेलमध्ये भाविकांची मोठी गर्दी असायची, परंतु आता ‘जय मल्हार’ मालिका सुरु झाल्यापासून दररोजच गर्दी जाणवत आहे.’’
– विजय झगडे (हॉटेल शिवानंद, जेजुरी)