पुणे दुसऱ्या तर, अकोला तिसऱ्या क्रमांकावर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनिल कांबळे

नागपूर : उपराजधानीतील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी कुख्यात गुन्हेगारांना मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचा सपाटा सुरू केला आहे. सर्वाधिक ६३ गुन्हेगार कारागृहात स्थानबद्ध करीत नागपूरने राज्यात प्रथम स्थान मिळवले आहे. दुसऱ्या स्थानावर पुणे (४४) तर तिसऱ्या स्थानावर अकोला (४१) आहे. नागपूर शहराला दोन गृहमंत्री लाभल्यानंतरही गुन्हेगारी कमी होत नव्हती. मात्र, अमितेश कुमार यांनी गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वप्रथम कुख्यात गुन्हेगारांची आणि टोळय़ांची यादी तयार केली. त्यानंतर प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका सुरू केला. त्यामुळे गेल्या वर्षभरात नागपूर शहरात राज्यातून सर्वाधिक ६३ गुन्हेगारांना थेट मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. या यादीत पुणे दुसऱ्या तर अकोला तिसऱ्या स्थानावर आहे. गुन्हेगारांच्या टोळय़ांवर वचक ठेवण्यासाठी शहरातील कुख्यात गुन्हेगारांच्या पाच टोळय़ांविरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली. २०१९ मध्ये १३ तर २०२० मध्ये आठ टोळय़ांविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई झाली, हे विशेष.

गुन्हेगारी समूळ नष्ट करण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी   प्रतिबंधक कारवाई करीत तब्बल सहा हजारांवर गुन्हेगारांचा आढावा घेतला. भारतीय फौजदारी दंड संहिता कलम १०७ अंतर्गत सर्वाधिक ४ हजार ४२४ गुन्हेगाराविरुद्ध तर  कलम ११०अंतर्गत २०१५ गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. गेल्यावर्षी याच कलमांतर्गत अनुक्रमे २ हजार ५०८ व ९०६ गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई झाली.  २०१९मध्ये अनुक्रमे ४ हजार ११४ आणि १ हजार ४१८ गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्यात आली. गुन्हेगारांवर वचक ठेवण्यात नागपूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.

स्थानबद्धता म्हणजे काय?

सामाजिक शांतता भंग करीत वारंवार गुन्हेगारी कारवायात लिप्त असलेल्या गुन्हेगारांवर पोलीस स्थानबद्धतेची कारवाई करतात. ही कारवाई झाल्यास गुन्हेगार थेट एका वर्षांसाठी कारागृहात बंदिस्त होतो. त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कारवाया  थांबतात आणि अन्य गुन्हेगारांवर वचक बसतो.

गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस कठोर उपाययोजना करीत आहेत. शहरातील ६३ गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही ही कारवाई सुरूच राहील.

– अमितेश कुमार (पोलीस आयुक्त)

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jail highest number criminals state ysh
First published on: 19-01-2022 at 00:26 IST