पुणे : स्वारगेट येथील गजबलेल्या देशभक्त केशवराव जेधे चौकातील भुयारी मार्गाचे दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. वाहनचालकांनी भुयारी मार्गाचा वापर न करता जेधे चौकातून सरळ सारसबागेकडे जावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
शंकरशेठ रस्त्याने सारसबाग, तसेच सिंहगड रस्त्याकडे जाणारे वाहनचालक देशभक्त जेधे चौकातील भुयारी मार्गाचा वापर करतात. भुयारी मार्गातील रस्त्याची दुरावस्था झाली असून, पावसाळ्यात तेथे पाणी साचते. भुयारी मार्गाच्या दुरस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. सोमवारपर्यंत (२२ सप्टेंबर) दुरुस्तीचे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे शंकरशेठ रस्त्याने सिंहगड रस्ता, तसेच सारसबागेकडून (अण्णाभाऊ साठे पुतळा चौक) टिळक रस्ता, बाजीराव रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी जेधे चौकातून सरळ साररबागेकडे जावे. वाहनचालकांनी भुयारी मार्गाचा वापर करु नये, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.
स्वारगेट भागात एसटी स्थानक, मेट्रो स्थानक, तसेच पीएमपी स्थानक असल्याने जेधे चैाक अहाेरात्र गजबजलेला असतो. सातारा, सिंहगड रस्ता, तसेच बाजीराव रस्त्याकडे जाणारे वाहनचालक जेधे चौकाचा वापर करतात.