पुणे : अकरावीचे प्रवेश राज्यभर ऑनलाइन पद्धतीने राबवण्याच्या निर्णयाला कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाने विरोध केला आहे. ग्रामीण भागात ऑफलाइन पद्धतीनेच प्रवेश प्रक्रिया राबवण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.
महासंघाचे समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली. गेल्या वर्षीपर्यंत मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती या महानगर क्षेत्रांमध्येच अकरावीची प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने, तर उर्वरित राज्यभरातील महाविद्यालय स्तरावर ऑफलाइन पद्धतीने राबवण्यात येत होती. मात्र, यंदा राज्यभरातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबवली जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर, ग्रामीण भागात ऑनलाइन प्रवेश करण्यास कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाने विरोध करून त्याची दहा कारणे दिली आहेत. ग्रामीण भागात नेटवर्क मिळत नाही, विशेषतः आदिवासी व डोंगराळ भागातील विद्यार्थी, पालकांकडे अँड्रॉइड मोबाइल नाहीत, ग्रामीण भागात अकरावीतील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध जागांपेक्षा विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे, ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची मागणी विद्यार्थी, पालक, शिक्षण संस्थांनी केलेली नाही, ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेबाबत जागृती झालेली नाही, ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला साहाय्य करण्याच्या नावाखाली विद्यार्थी, पालकांची आर्थिक लूट होत आहे.
उन्हाळ्याच्या सुटीतही शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात सुटी न घेता या कामासाठी वेळ देऊनही काहीच निष्पन्न होत नाही, ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेमुळे वर्ग सुरू होण्यास उशीर होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते, ऑनलाइन प्रक्रियेसाठी अकारण खर्च करावा लागतो, प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्याच संकेतस्थळाच्या तांत्रिक बिघाडामुळे प्रक्रिया खोळंबल्याने पालक, विद्यार्थ्यांच्या मनात चीड निर्माण झाली आहे. त्यामुळे ऑनलाइन प्रक्रिया थांबवून पूर्वीप्रमाणेच ऑफलाइन पद्धतीने प्रवेश देण्याच्या मागणीचे पत्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांना देण्यात आल्याचे प्रा. आंधळकर यांनी नमूद केले.