पुणे : नियोजित गृहप्रकल्पाच्या आवारातून अ‍ॅल्युमिनिअम प्लेट चोरणाऱ्या चोरट्याला काळेपडळ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ६१ अ‍ॅल्युमिनिअम सेंट्रींग प्लेट आणि टेम्पो असा एकूण दोन लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

लहू चंद्रकांत लोणार (रा. महंमदवाडी, हडपसर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. हडपसरमधील काळेपडळ भागातील एका नियोजित गृहप्रकल्पाच्या आवारातून ॲल्युमिनअम प्लेट चोरीला गेल्याची घटना घडली होती. याबाबत काळेपडळ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर काळेपडळ पोलिसांच्या पथकाने गृहप्रकल्पास भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. पसार आरोपी लोणार हा उंड्री चौकात थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला संशयावरुन ताब्यात घेतले. चौकशीत त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसाी खाक्या दाखविताच त्याने गृहप्रकल्पाच्या आवारातून ६१ ॲल्युमिनम प्लेट चोरल्याची कबुली दिली.

पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानासिंग पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक अमर काळंगे, सहायक निरीक्षक अमित शेटे, प्रवीण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतीक लाहिगुडे, श्रीकृष्ण खोकले, विशाल ठोंंबरे, शाहीद शेख, लक्ष्मण काळे, नितीन शिंदे, अतुल पंधरकर यांनी ही कामागिरी केली.