पुणे : वसईची केळी, नारायणगावचा टोमॅटो, अलिबागचा पांढरा कांदा यांच्या  पंगतीत आता करमाळय़ाच्या रताळय़ांचे नाव घ्यावे, इतकी इथली शेती आणि आर्थिक व्यवहार या उत्पादनावर गेली चार दशके केंद्रित झाला आहे. आषाढी एकादशी निमित्ताने करमाळय़ातील रताळी राज्यभरातील बाजारपेठेत लक्ष वेधून घेत असतात. त्यात करमाळा आणि परिसरातील शेतकऱ्यांचे नियोजन महत्त्वाचे असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आषाढी यात्रेच्या काळात काढणीला येतील असे नियोजन करून करमाळा तालुक्यातील मोरवड, मांजरगाव, (पान ४ वर) (पान १ वरून) राजुरी, रितेवाडी, उंडरगाव, सोनगाव, उंबरड या गावांत मागील चाळीस वर्षांपासून रताळय़ांची लागवड केली जाते. प्रामुख्याने मोरवड गावातील माळी समाजाच्या शेतकऱ्यांकडून पारंपरिक पद्धतीने लागवड केली जात होती, आता त्यांच्यासह परिसरातील गावांतही रताळय़ांची लागवड होऊ लागली आहे.

उंडरगाव येथील रताळी उत्पादक शेतकरी सिद्धार्थ कांबळे म्हणाले,की पावसाळय़ाच्या तोंडावर चार पैसे हमखास हातात येतात म्हणूनच आम्ही लागवड करतो. पण, लागणीपासून काढणीपर्यंत आणि बाजारात रताळी घेऊन येईपर्यंत चाळीस किलोंच्या पोत्याला सरासरी ८०० रुपये खर्च येतो. बाजारात ३० ते ३२ रुपयांचा दर मिळतो आहे. त्यामुळे पोत्यामागे सरासरी ४००-५०० रुपये पदरात पडतात. पण, यासाठी मोठे मनुष्यबळ लागते. आता शेतात काम करण्यासाठी मजूर मिळत नाही, रताळी भरण्यासाठी पोतीही मिळत नाहीत. सहा महिने राबून एका पोत्यामागे ४००-५०० रुपये मिळत असले तरी त्यात शेतकरी कुटुंबाचे श्रम कुठेच धरले जात नाहीत.

इतर पिकांसाठी मदत..

रताळी लागवडीतून फारसे आर्थिक उत्पन्न येते, असे नाही. पण, सहा महिन्यांच्या या पिकातून आलेल्या पैशांचा उपयोग लागणीच्या, खोडव्याच्या उसाला आणि खरिपात पेरणी झालेल्या पिकांना प्रामुख्याने खते घालण्यासाठीच होतो. 

थोडी माहिती..

करमाळा तालुक्यातील गावांत पारंपरिक पद्धतीने रताळय़ांची लागवड केली जाते. पूर्वी मोरवड गावातील माळी समाजाच्या शेतकऱ्यांकडून पारंपरिक पद्धतीने लागवड केली जात होती, त्यांचे पाहून शेजारील गावातही रताळय़ांची लागवड होऊ लागली. शहरी भागांत वर्षभर रताळय़ाच्या वेफर्सची मागणी असते.

देशी वाण लोकप्रिय..

लाल रंगाच्या देशी वाणाची करमाळय़ातील रताळी राज्यभरात प्रसिद्ध आहेत. प्रामुख्याने पुणे आणि मुंबईतून येथील रताळय़ांना मोठी मागणी असते. उजनी धरणाच्या पाण्यामुळे करमाळा तालुक्यात आता उसाच्या शेतीला प्राधान्य दिले जाते. पण, या परिसरात काही शेतकऱ्यांनी रताळय़ांची लागवड कायम ठेवली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karmala sweet potato demand increase on the occasion of ashadi ekadashi zws
First published on: 07-07-2022 at 04:28 IST