पुणे : कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राजकीय पक्षांमध्ये पैसा खर्च करण्यावरून चढाओढ लागली आहे. आतापर्यंत केलेल्या प्रचार खर्चात कसब्यात भाजप, तर चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराकडून सर्वाधिक खर्च करण्यात आला आहे. ही बाब निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या उमेदवार खर्च अहवालावरून समोर आली आहे.

पोटनिवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या रविवारी (२६ फेब्रुवारी) मतदान होणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा ४० लाख रुपये आहे. उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरल्यापासून ते प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडेपर्यंतच्या कालावधीमधील खर्च रोजच्या रोज विधानसभेच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात द्यावा लागतो. फ्लेक्स, चहा,न्याहरी, जेवण, खुर्ची, कार्यालयाचे भाडे, प्रचारासाठीच्या वाहनांचा खर्च, सभेचा खर्च, पत्रक, ध्वनिक्षेपक व वर्धक आदींचे दरपत्रक जिल्हा प्रशासनाकडून निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार खर्च ग्राह्य धरण्यात येतो. खर्च देखरेख पथकामध्ये लेखा शाख़ा आणि आयकर विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

हेही वाचा >>> पुणे : भाजपच्या बालेकिल्ल्यातील त्या फलकाची शहरभर चर्चा

पोटनिवडणुकीसाठी १५ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी आणि २४ फेब्रुवारी अशा तीन टप्प्यांत उमेदवारांच्या प्रचार खर्चाची तपासणी करण्यात येत आहे. त्यानुसार खर्च तपासणीचे दोन टप्पे पार पडले असून तिसरा टप्पा बाकी आहे. त्यानंतरच या दोन्ही मतदारसंघात उमेदवारांनी किती खर्च केला ही बाब स्पष्ट होणार आहे. कसब्यात १६, तर चिंचवडमध्ये २८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामध्ये कसब्यात भाजपचे हेमंत रासने, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांच्यात प्रमुख लढत आहे, तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे विठ्ठल (नाना) काटे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी तिरंगी लढत होत आहे.

हेही वाचा >>> कसबा, चिंचवड पोटनिवडणूक: प्रचारात गुंठेवारीचा प्रश्न ऐरणीवर, मतदानाआधी न्यायालयाच्या निकालाची शक्यता

दरम्यान, कसब्यात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी उमेदवारी अर्ज भरल्यापासून २० फेब्रुवारीपर्यंत तीन लाख ७५ हजार रुपये खर्च केले आहेत, तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी आठ लाख ३३ हजार रुपयांचा खर्च केला आहे. चिंचवडमध्ये १५ फेब्रुवारीपर्यंत भाजपच्या जगताप यांनी चार लाख ९७ हजार ९१७, तर २० फेब्रुवारीपर्यंत १५ लाख ६१ हजार ७८५ रुपये खर्च केला आहे. राष्ट्रवादीचे काटे यांनी १५ फेब्रुवारीपर्यंत चार लाख ७४ हजार ७४० रुपये, तर २० फेब्रुवारीपर्यंत २१ लाख ४६ हजार ९३३ रुपये खर्च केले आहेत. अपक्ष कलाटे यांनी १५ फेब्रुवारीपर्यंत एक लाख १३ हजार ९०२, तर २० फेब्रुवारीपर्यंत १२ लाख ३९७ रुपये खर्च केले आहेत.

हेही वाचा >>> मतदान करताना भाजपाचं उपरणं घालणं हेमंत रासनेंना भोवणार? विरोधकांच्या तक्रारीनंतर निवडणूक अधिकाऱ्यांकडून गुन्हा दाखल

उमेदवारांनी दिलेली खर्चाची आकडेवारी आणि प्रत्यक्ष केलेला खर्च याची देखील फेरतपासणी निवडणूक कार्यालयाकडून केली जात आहे. निवडणूक काळात केलेल्या खर्चाच्या नोंदी निवडणूक कार्यालयाने तयार केल्या आहेत. उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली असून त्यांनी दोन वेळा उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदींची तपासणी केली, अशी माहिती निवडणूक कार्यालयाकडून देण्यात आली.