पुणे: पुणेकर खवय्यांना शहरातील खाद्यसंस्कृतीबद्दल नेहमीच अभिमान वाटतो. त्यांच्या या अभिमानावर आता जागतिक पातळीवर शिक्कामोर्तब झाले आहे. कॅम्पमधील कयानी बेकरी आणि चितळे बंधू मिठाईवाले यांचा जगामधील आघाडीच्या १५० मिठाई केंद्रांमध्ये समावेश करण्यात आला आहे. टेस्ट ॲटलास या जागतिक खाद्य मार्गदर्शकाने ही क्रमवारी जाहीर केली आहे.

टेस्ट ॲटलासने जगातील आघाडीच्या १५० मिठाई केंद्रांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पहिल्या स्थानी लिस्बनमधील रूआ डी बेलेम असून तेथील प्रसिद्ध मिठाई पेस्टल डी बेलेम आहे. यादीत भारतातील दहा ठिकाणे असून, त्यात पुण्यातील कयानी बेकरी आणि चितळे बंधू मिठाईवाले यांचा समावेश आहे. कयानी बेकरी ही कॅम्पमध्ये ईस्ट स्ट्रीटवर असून, त्यांचा मावा केक प्रसिद्ध आहे. इराणमधून आधी मुंबईत आणि तिथून नंतर पुण्यात आलेल्या खोडायार, होरमाजदियार आणि रूस्तम या कयानी बंधूनी १९५५ मध्ये ही बेकरी सुरू केली. कयानी बंधूंच्या पुढील पिढ्या आता हा व्यवसाय सांभाळत आहेत.

हेही वाचा… पुण्यात मेट्रो मार्गांचा तिढा! पीएमआरडीए, महामेट्रोची समान मार्गांकडे धाव

चितळे बंधू मिठाईवाले यांची सुरुवात १९५० मध्ये झाली. रघुनाथ चितळे आणि नरसिंह चितळे या बंधूंनी या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचे पहिले दुकान बाजीराव रस्त्यावर सुरू झाले. आता तिसरी पिढी हा व्यवसाय सांभाळत आहे. केवळ देशातच नव्हे तर परदेशातही चितळेंची उत्पादने पोहोचली आहेत. बाकरवडी आणि विविध प्रकारच्या मिठाईसाठी चितळे बंधू ओळखले जातात.

देशातील आघाडीची मिठाई केंद्रे

  • मावा केक: कयानी बेकरी (पुणे)
  • रसगुल्ला: के.सी.दास (कोलकता)
  • रम बॉल्स: फ्लरीज (कोलकता)
  • फ्रूट बिस्कीट : कराची बेकरी (हैदराबाद)
  • संदेश: बलराम मलिक अँड राधारमण मलिक (कोलकता)
  • आईसक्रीम सँडविच: के. रुस्तम अँड कंपनी (मुंबई)
  • कुल्फी: कुरेमल्स कुल्फी (दिल्ली)
  • कुल्फी फालुदा: प्रकाश कुल्फी (लखनौ)
  • बाकरवडी: चितळे बंधू (पुणे)
  • जिलेबी: जलेबीवाला (दिल्ली)