पुणे : पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या केशवनगर येथील गायरान क्षेत्रातील बारा नैसर्गिक जलस्रोतांत राडारोडा टाकण्यात आल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कबुली दिली. नैसर्गिक जलस्रोतांमध्ये राडारोडा टाकण्यात येऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रस्तावित केल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
केशवनगर येथे गायरान क्षेत्रातील बारा ठिकाणच्या नैसर्गिक जलस्रोतात ६ मे रोजी मोठ्या प्रमाणावर राडारोडा टाकण्यात आला होता. त्याबाबतची तक्रार खरी आहे का या संदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आल्यानंतरही त्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात येत असून, राडारोडा टाकणाऱ्यांवर राज्य शासनाने कोणती कारवाई केली आणि या घटनेची चौकशी सुरू आहे का, अशी विचारणा वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार बापूसाहेब पठारे यांनी विधानसभेत केली होती. त्यासंदर्भात बोलताना नैसर्गिक जलस्त्रोतांध्ये राडारोडा टाकण्यात आल्याची कबुली एकनाथ शिंदे यांनी दिली.
‘पुणे महानगरपालिकेच्या हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयामार्फत यापूर्वी गायरान क्षेत्राच्या ठिकाणी राडारोडा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. त्यानुसार २० डिसेंबर २०२४, १४ जून २०२४ आणि २५ मार्च २०२५ स्वतंत्र कारवाई करून राडारोडा टाकणाऱ्यांकडून २० हजार रुपये एवढी रक्कम वसूल करण्यात आली आहे. तसेच क्षेत्रीय कार्यालयामार्फत राडारोडा टाकणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून, मुंढवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांकडे त्या संदर्भात पत्रव्यवहारही करण्यात आला होता.
त्यानुसार मुंढवा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांकडून संबंधितांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. नैसर्गिक जलस्रोत किंवा गायरान जमिनींच्या क्षेत्रावर राडारोडा टाकण्यात येऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रस्तावित करण्याची सूचनाही महापालिकेला करण्यात आली आहे. त्यानुसार महापालिककडून सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याची कार्यवाही महापालिकेकडून हाती घेण्यात आली आहे.
तसेच जागेच्या संरक्षणासाठी सीमाभिंतीची उभारणी, पुणे महापालिकेचा नामफलकाची उभारणी करण्याबरोबरच या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. ही कामे येत्या काही दिवसांत पूर्ण होतील,’ असे शिंदे यांनी स्पष्ट केले.