पुणे : स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड मेट्रो मार्गिकेअंतर्गत असलेले खडकी मेट्रो स्थानक शनिवारपासून (२१ जून) प्रवासी सेवेत दाखल होणार आहे. हे स्थानक खडकी रेल्वे स्थानकाच्या अगदी जवळ असल्यामुळे आणि या मेट्रो स्थानकातून प्रवाशांना थेट खडकी रेल्वे स्थानकात जाण्यासाठी मार्ग असल्यामुळे मेट्रो आणि रेल्वे या दोन्ही वाहतूक सेवांचे या ठिकाणी एकत्रीकरण शक्य झाले आहे. हे स्थानक सुरू होणार असल्याने या परिसरातील नागरिकांना तसेच रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुणे मेट्रोच्या सेवेचा लाभ घेणे सुलभ होईल, असा दावा महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कार्पोरेशनकडून करण्यात आला आहे.

खडकी स्थानक सुरू झाल्यामुळे प्रवाशांना खडकी, विद्यापीठ, औंध आयटी पार्क, खडकी कॅन्टोन्मेंट, खडकी बाजार, रेंज हिल, औंध रस्ता, ऑर्डनन्स फॅक्टरी हॉस्पिटल, मुळा रस्ता अशा अनेक ठिकाणी पोहोचणे सोयीस्कर होणार आहे.‘मेट्रोच्या विस्तारात खडकी स्थानकाची भर पडल्याने पुणे आणि पिंपरी चिंचवड या जुळ्या शहरांना जोडणाऱ्या या रस्त्यावरील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट झाली आहे. प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना अधिक सोयीस्कर आणि अखंड प्रवासाचा अनुभव घेता येईल,’ असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.