पुणे : खराडी पार्टी प्रकरणातील आरोपी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) नेते एकनाथ खडसे यांचे जावई डाॅ. प्रांजल खेवलकर यांनी अमली पदार्थांचे सेवन केले नसल्याचा अहवाल न्यायवैद्यकशास्त्र प्रयोगशाळेने (एफएसएल) पुणे पोलिसांना दिला आहे.

खराडीतील एका हाॅटेलमध्ये २५ जुलै रोजी झालेल्या पार्टीवर गुन्हे शाखेने छापा टाकला. या प्रकरणी डाॅ. प्रांजल मनीष खेवलकर, निखिल जेठानंद पोपटाणी, समीर फकीर महमंद सय्यद, सचिन सोमाजी भोंबे, श्रीपाद मोहन यादव, ईशा देवज्योत सिंग, प्राची गोपाल शर्मा यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून २ ग्रॅम ७० मिलीग्रॅम कोकेन, ७० ग्रॅम गांजा सदृश पदार्थ, हुक्का पात्र, दहा मोबाइल संच, सुगंधी तंबाखू, दोन मोटारी, मद्याच्या बाटल्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेले कोेकेन, गांजासदृश अमली पदार्थ तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. डाॅ. खेवलकर यांचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्यांच्या रक्ताचे नमुने न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. प्रयोगशाळेने याबाबतचा अहवाल नुकताच पुणे पोलिसांना दिला. या अहवालात डाॅ. खेवलकर यांनी अमली पदार्थांचे सेवन केले नसल्याचे म्हटले आहे. खराडी पार्टी प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्राबरोबर न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेचा अहवाल आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

या अहवालामुळे डाॅ. खेवलकर यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, पार्टीत अमली पदार्थ कोणी पुरविले, या दृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. डाॅ. खेवलकर यांना २५ सप्टेंबर रोजी जामीन मंजूर झाला होता.