अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला होता. याप्रकरणातील आरोपी पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहेत. यातील जितेंद्र शिंदे या आरोपीनं कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पहाटेच्या सुमारास पोलीस कर्मचारी गस्तीवर गेले असताना जितेंद्र शिंदेनं आत्महत्या केल्याचं समोर आलं.

अहमदनगर येथील कोपर्डीत १३ जुलै २०१६ रोजी एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली होती. या खूनप्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदे हा येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. आज ( १० सप्टेंबर ) कारागृहात गस्तीवर असलेल्या कर्मचाऱ्याला जितेंद्र शिंदे हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

त्यानंतर जितेंद्र शिंदेला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, डॉक्टरांनी जितेंद्र शिंदे याला मृत घोषित केलं. शिंदेनं कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली? हे अद्याप समजू शकलं नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.