पुणे : पुणे महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) रिंग रोडसाठीची दहा गावांतील भूसंपादनासाठीची संयुक्त मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानुसार भूसंपादनासाठी थेट वाटाघाटीची प्रक्रिया प्रशासनाकडून हाती घेण्यात आली आहे. उर्वरित तीन गावांची संयुक्त मोजणी अद्याप प्रलंबित आहे.

शहर आणि परिरसरातील वाहतूककोंडी सोडविण्याच्या दृष्टीने दोन रिंग रोड प्रस्तावित आहेत. त्यांपैकी एका रिंग रोडचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात येणार आहे. ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत ८३ किलोमीटर लांब आणि ६५ मीटर रुंदीच्या रिंग रोडची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी ११५ हेक्टर जागेचे संपादन करावे लागणार आहे.

राज्य रस्ते विकास महामंडळ करीत असलेला रिंग रोड हा सोळू गावापर्यंत येत आहे. त्या ठिकाणी ‘पीएमआरडीए’चा रिंग रोड जोडला जाणार आहे. त्यामुळे १३ गावांतील जमिनीचे संपादन करण्यासाठी ‘पीएमआरडीए’ने जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव दिला होता.

‘पीएमआरडीए’च्या हद्दीतील वडाची वाडी, भिलारेवाडी, पिसोळी, येवलेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, जांभूळवाडी, आंबेगाव खुर्द, कदमवाक वस्ती, सोळू, निरगुडी, वडगाव शिंदे, म्हाळुंगे या गावांची संयुक्त मोजणी प्रस्तावित होती. त्यांपैकी येवलेवाडी, जांभूळवाडी आणि कदमवाक वस्ती या तीन गावांची संयुक्त मोजणी अद्याप झालेली नाही. उर्वरित दहा गावांतील जमिनींच्या मोजणीचे नकाशे नुकतेच जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्यानुसार गावांसाठी थेट खरेदीने भूसंपादनाची कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

या भूसंपादनासाठी चालू बाजारभावाने मोबदल्याची रक्कम दिली जाणार आहे. मोजणी पूर्ण झाल्यानंतर बाजारमूल्य दरनिश्चिती समितीची बैठक होऊन जागेचे दर निश्चित केले जातील. त्यानुसार भूसंपादन प्रक्रिया सुरू होऊन जमीनमालकांना बाजारभावाने रक्कम देण्यात येईल.
कोट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिंग रोडसाठी १३ गावांतील भूसंपादनाचा प्रस्ताव प्राप्त झाला होता. त्यानुसार १० गावांची मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मोजणी पूर्ण झालेल्या गावांतील भूसंपादनासाठी संमतीने खरेदीच्या वाटाघाटी सुरू आहेत. त्याबाबत लवकरच प्रक्रिया पूर्ण होईल. कल्याण पांढरे, भूसंपादन समन्वयक, जिल्हाधिकारी कार्यालय.