पुणे : उत्तर प्रदेशातील दशहरी आंब्यांची आवक मार्केट यार्डातील फळबाजारात सुरू झाली आहे. दशहरी आंब्यांना चांगली मागणी आहे. किरकोळ बाजारात एक किलो दहशरी आंब्यांना ८० ते १०० रुपये किलो दर मिळाला आहे.
रत्नागिरी, तसेच कर्नाटकातील आंब्यांचा हंगाम संपला आहे. मुळशी, वेल्हा तालुक्यातील गावरान आंब्यांचा हंगाम अखेरच्या टप्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील दशहरी आंब्यांचा हंगाम सुरू झाला असून, मार्केट यार्डातील फळबाजारात आवक वाढली आहे. उत्तर प्रदेशातील लखनौ, मलियाबाद परिसरातून दशहरी आंब्यांची आवक होत आहे. मार्केट यार्डातील फळबाजारात तीन ते चार हजार खोक्यांमधून दशहरी आंब्यांची आवक झाली.
दशहरी आंबा चवीला गोड आहे. पुण्यातील फळबाजारातून राज्यातील अन्य शहरात दशहरी आंबा विक्रीस पाठविला जात आहे. दशहरी आंब्यांसह लंगडा जातीच्या आंब्याची आवक सुरू झाली आहे. जुलै महिनाअखेरीपर्यंत उत्तर प्रदेशातून दशहरी आणि लंगडा आंब्यांची आवक सुरू राहणार असल्याचे मार्केट यार्डातील दशहरी आंब्यांचे व्यापारी के. एल. पंजाबी पेढीचे भरत पंजाबी यांनी सांगितले.
जून महिन्यात उत्तर प्रदेशातील दशहरी आंब्यांची आवक सुरू होते. दशहरी आंबा चवीला साखरेप्रमाणे गोड असतो. पुणे, तसेच पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या संख्येने उत्तर भारतीय नागरिक वास्तव्यास आहेत. उत्तर भारतीयांकडून दशहरी आणि लंगडा या जातीच्या आंब्यांना मोठी मागणी असते, असे पंजाबी यांनी नमूद केले.
मलियाबादमधील दहशरी
उत्तर प्रदेशातील मलियाबाद, तसेच लखनऊ भागात दशहरी, लंगडा या आंब्यांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. मलियाबादमधून संपूर्ण देशभरात दशहरी आंबा विक्रीस पाठविला जातो. मलियाबादमधील दशहरी आंब्यांची प्रतवारी उत्तम मानली जाते, असे व्यापारी भरत पंजाबी यांनी सांगितले.
दशहरी, लंगडा आंब्याचे दर
- दहशरी आंबा (पाच ते सहा किलो) – ३०० ते ४५० रुपये, किरकोळ बाजारातील किलोचे दर – ८० ते १०० रुपये
- लंगडा आंबा (पाच ते सहा किलो) – ३५० ते ५०० रुपये, किरकोळ बाजारातील किलोचे दर – ८० ते १२० रुपये