पुणे : ज्येष्ठ संगीतकार-गायक पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या वतीने युवा पिढीच्या लोकप्रिय गायिका मधुरा दातार यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे यंदा चौथे वर्ष असून, यापूर्वी पं. सत्यशील देशपांडे, विभावरी जोशी-आपटे आणि संजीवनी भेलांडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

लता मंगेशकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून रविवारी (२८ सप्टेंबर) यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या ‘मी लता दीनानाथ’ या लतादीदींच्या लोकप्रिय मराठी आणि हिंदी गीतांच्या सादरीकरण कार्यक्रमात सांस्कृतिकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते मधुरा दातार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पं. हृदयनाथ मंगेशकर, सुरेश वाडकर, मोहन जोशी, सुशील कुलकर्णी, सई ताम्हणकर आणि प्राजक्ता माळी या वेळी उपस्थित राहणार आहेत.

‘मी लता दीनानाथ’ कार्यक्रमात पं. हृदयनाथ मंगेशकर हे लतादीदींच्या आठवणी सांगणार असून, मधुरा दातार, विभावरी आपटे-जोशी आणि मनीषा निश्चल गीते सादर करणार आहेत. मनोरंजन संस्थेची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन शिरीष थिएटर्सने केले आहे.